
Jalgaon News : राजस्थानच्या कार चोरट्याला अमळनेरमध्ये अटक
अमळनेर : राजस्थानातील चारचाकी वाहने चोराला अमळनेर पोलिसांनी येथील स्टेट बँकजवळ पकडला. त्याला राजस्थान पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिस नाईक मिलिंद भामरे, सूर्यकांत साळुंके व कपिल पाटील यांनी सुभाष चौकातून रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले.
त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास पोलिसांनी थेट पोलिस ठाण्यात आणले व पोलिस खाक्या दाखविल्या. त्यावेळी त्याने आपण परबतसिंग मदनसिंग भाटी (रा. दहीफडा खिच्या, ता. लोणी झवर, जि. जोधपूर, राजस्थान) येथील असल्याचे सांगितले. (Car thief from Rajasthan Arrested in Amalner Jalgaon News)
हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
त्यावरून अमळनेर पोलिसांनी राजस्थान पोलिसांशी संपर्क साधला. तो इसम अट्टल चारचाकी वाहन चोर आहे व त्याचा राजस्थान पोलिस कसून शोध घेत आहेत. त्याच्यावर ५ डिसेंबरला झवर पोलिस ठाण्यात कार चोरी केल्याबाबत गुन्हा दाखल असून, त्याच्या गाडीवर बनावट गोवा पासींगचा क्रमांक आहे.
तो गाडी घेऊन महाराष्ट्राच्या दिशेने गेला असून, स्वत:चा मोबाईल बंद करून ठेवला आहे, अशी माहिती राजस्थान पोलिसांनी माहिती दिली. त्यावरून त्याला अमळनेर पोलिसांनी गाडीबाबत विचारणा केली असता, ती मध्य प्रदेशात महू येथे लपविली आहे, असे त्याने सांगितले. नंतर पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी राजस्थान पोलिसांना अमळनेरला बोलावून त्या चोरट्याला ताब्यात दिले.