जळगावकरांची कोरोना चाचणीकडे पाठ; शहरात वाढताय सुपर स्प्रेडर | Corona Third Wave | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona test

जळगावकरांची कोरोना चाचणीकडे पाठ; शहरात वाढताय सुपर स्प्रेडर

जळगाव : कोरोनासदृश (Corona) लक्षणे असलेले सामान्य रुग्ण आता चाचण्या करण्याच्या भानगडीत पडत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. असे रुग्ण खासगी, फॅमिली डॉक्टरच्या (Family doctor) सल्ल्याने घरीच उपचार घेत असल्याचे दिसत असून, त्यामुळे बाधित असूनही समोर न येणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे मानले जात आहे.

सक्रिय रुग्णसंख्या 10 वरून हजारावर

जळगाव शहर व जिल्ह्यात सध्या कोरोनाची तिसरी लाट (Third wave) सुरू झाली आहे. गेल्या दहा- बारा दिवसांतच सक्रिय रुग्णसंख्या दहावरून हजारावर पोचली आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असताना त्या प्रमाणात चाचण्याही वाढत होत्या. या वेळच्या तिसऱ्या लाटेत मात्र चाचण्यांची संख्याही मर्यादित असल्याचे दिसून येते. गेल्या काही दिवसांत दररोजच्या नव्या रुग्णांची सरासरी दोनशेवर असली, तरी चाचण्यांची संख्या अडीच हजारांहून अधिक आकडा गाठू शकलेली नाही.

हेही वाचा: जळगावातील प्रमुख रस्त्यांचे उजळणार भाग्य

चाचण्यांकडे पाठ

एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढताय, तर दुसरीकडे वातावरणाचा परिणाम म्हणून ‘व्हायरल’ रुग्णसंख्येचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसून येते. कोरोनासारखीच लक्षणे असली तरी काही खासगी व फॅमिली डॉक्टर अशा रुग्णांना ‘व्हायरल’ संसर्ग असल्याचे सांगत त्यासंबंधी उपचार देत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकही या तिसऱ्या लाटेला फारसे गांभीर्याने घेत नसून चाचण्यांकडे पाठ फिरवत आहेत.

अनभिज्ञ रुग्ण ‘सुपर स्प्रेडर’

ज्यांना सामान्य ‘व्हायरल’ संसर्गामुळे काही लक्षणे जाणवत आहेत ते चाचण्या करत नसल्याने कदाचित कोरोना बाधितही असू शकतात. मात्र, ते स्वतः त्यापासून अनभिज्ञ आहेत. त्यामुळे ते ‘सुपर स्प्रेडर’ही ठरू शकतात.

खासगी यंत्रणेवर ताण

गेल्या काही दिवसांमध्ये जनरल फिजिशियन डॉक्टरांकडे रुग्णांची गर्दी वाढली आहे. सर्दी, खोकला, थंडी-ताप अशी लक्षणे असलेले रुग्ण वाढल्याने खासगी आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे.

हेही वाचा: जळगाव : भरीत पार्ट्यांना यंदा ब्रेक; अतिवृष्टीने वांगी कोपली

सरकारी बेड रिकामेच

लक्षणे दिसून येत असली तरी चाचण्या होत नसल्याने अशा रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरण होत नाही. त्यामुळे महापालिका अथवा सरकारी कोविड सेंटरमधील बेड रिक्तच आहेत. दुसरीकडे या तिसऱ्या लाटेत बाधित होणाऱ्यांमध्ये लक्षणे अगदीच सौम्य असल्याने बहुतांश, म्हणजे जवळपास ९५ टक्के रुग्ण घरीच उपचार घेऊन बरे होत आहेत. त्यामुळेही सरकारी रुग्णालयांमधील कोविड कक्षातील बेड रिकामेच आहेत. विशेष म्हणजे, या लाटेत सक्रिय रुग्णांची संख्या हजारावर गेली असली तरी ऑक्सिजनवर अवघे सात रुग्ण असून, आयसीयूत अद्याप एकही रुग्ण नाही, ही दिलासादायक बाब आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CoronavirusJalgaonomicron
loading image
go to top