
लेखक - सचिन चौघुले
दीप सारे जाती येथे विरून, विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून, झडून.
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून,
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे!
अंत झाला अस्ताआधी, जन्म एक व्याधी,
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी...
आरती प्रभूंनी आपल्या कवितेतून मांडल्याप्रमाणे आपल्याला आजूबाजूला अशी कित्येक माणसे रोज पाहायला मिळतात, की जी का जगताहेत आणि कोणत्या आशेवर. आला दिवस ढकलताहेत, असा प्रश्न पडतो. त्यांच्या आयुष्यात ना कधी काही चांगले घडते; ना ती कधी गरिबी, अपयश, ताणलेले नातेबंध, नकोसेपण, अवहेलना, तिरस्कृत जगणे या चक्रातून बाहेर पडतं. तरीही ही माणसे जगत असतात.
असेच जीवन जगत असणाऱ्या तीन मित्रांच्या व्यथेची कहाणी मांडणारे डॉ. हेमंत कुलकर्णी लिखित व दिग्दर्शित ‘मुसक्या’ नाटक जळगावच्या (कै.) शंकरराव काळुंखे चॅरिटेबल ट्रस्टने ६१ वी महाराष्ट्र हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेचे सातवे पुष्प गुंफतांना सादर केले.
तात्या (योगेश शुक्ल) साठ-सत्तरच्या दशकातील माणसांचे प्रतिनिधित्व करतो, तर रंगराव (अमोल ठाकूर) त्यानंतरच्या १०-१५ वर्षांतील पिढीचे, तर नामदेव (अम्मार मोकाशी) अलीकडच्या काळातील लोकांचे प्रतिनिधित्व करतो. त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनात येऊन गेलेल्या स्त्री (मंजूषा भिडे) भूमिकामधून नाटक फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जाते.
या तिघांची परिस्थिती आणि वयोगट वेगळा असला, तरी जीवनातील दुःख काही बदललेले नाही. गरिबीमुळे नशिबी सतत आलेल्या अवहेलना भोगल्याने, संवेदना बोथट व बधीर झालेल्या माणसांची दुर्लक्षित बाजू मांडताना लेखकाने लिहिलेल्या या नाटकाचा आकृतिबंध ॲब्सर्ड शैलीतील आहे. नाटकातील विषयाचा आवाका पाहता त्याला आवश्यक ती गती देण्यात दिग्दर्शक डॉ. हेमंत कुलकर्णी यशस्वी ठरतात.
लेखक आणि दिग्दर्शकाने दिलेल्या साच्याबरहुकूम त्यात रंग भरले ते कलावंत व तंत्रज्ञांनी. चारही कलावंतांनी त्यांना मिळालेल्या भूमिकांचे बेअरिंग अखेरपर्यंत टिकवत उपस्थित प्रेक्षकांना विविध भावनाविष्कारांचा अनुभव दिला, तर काही ठिकाणी कथानकातील अनपेक्षित कलाटणीही अनुभवण्यास दिली. तात्या बायको मेल्याचे किंवा मुलाने बेघर केल्याच्या दुःखाचे भांडवल न करता आपल्या दोन्ही मित्रांना विविध संकटात टाकून त्यातून आनंद मिळवत असताना, अचानक दोन्ही मित्र जेव्हा तात्याच्या जखमेची खपली काढतात, तेव्हा हतबल झालेला तात्या, बायकोमुळे त्रासलेला पण आहे.
त्यातही जीवनाचे कारण शोधणारा भावडा रंगराव, मोठा संगीतकार किंवा गायक होण्याचा प्रसंगी प्रेमात असफल झालेला नामदेव या छटा रंगविण्यात यशस्वी ठरतात. या तिन्ही पात्रांच्या जीवनात आलेली स्त्री रंगविताना मंजूषा भिडे वेगवेगळ्या वयोगटाचे मॅनारिझम व भावनांच्या छटा दाखवत या नाट्यात अधिकच रंग भरतात.
सचिन आढारे यांचे नेपथ्य पडक्या चाळीचे स्थळ सूचकरित्या उभे करण्यात, तर प्रसंगागणिक उत्कंठा वाढविणारे धनंजय धनगर यांचे ध्वनी संकलन व उदय पाठक यांचे पार्श्वसंगीत. यात विशेषतः उल्लेख करावा लागेल तो ठिकठिकाणी वापरलेल्या गाण्यांचा. जयेश कुलकर्णी यांची प्रकाशयोजना चपखलपणे या प्रसंगातून त्या प्रसंगात नेत नाट्याची गती कायम राखणारी ठरली. अपूर्वा कुलकर्णी, नीलेश जगताप, आशिष राजपूत, गणेश बारी, पद्मनाभ देशपांडे यांची रंगमंच व्यवस्था चोह होती.
भावभावनांच्या अविष्कारात प्रेक्षकांना गुंतविणारा नाट्यानुभव दिल्याबद्दल (कै.) शंकरराव काळुंखे चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व कलावंत व तंत्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.