Latest Marathi News | रस्त्याचा प्रश्‍न विधिमंडळातही गाजला; पण दुरुस्ती कधी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon: Piles of gravel lying on the road from Dudh Federation to Railway Station

Jalgaon News : रस्त्याचा प्रश्‍न विधिमंडळातही गाजला; पण दुरुस्ती कधी?

जळगाव : शहरातील रस्त्यांचा प्रश्‍न विधान परिषद आणि विधान सभेतही गाजला. मात्र, दुरुस्ती कधी होणार, हाच प्रश्‍न जनतेच्या मनात आहे. दूध फेडरेशन ते रेल्वेस्थानक रस्त्याचे काम महिनाभरापासून सुरू आहे.

मात्र, संथगतीच्या कामामुळे जनता त्रस्त आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जळगावकर पाच वर्षांपासून त्रास सहन करीत आहे. एकीकडे रस्त्यांसाठी कोटीच्या कोटी रुपयांच्या घोषणा होत आहेत. (Dudh Federation to Railway Station road work problems public question to government Jalgaon News)

हेही वाचा: Nashik News : भाजीपाला बाजारात आवक वाढल्याने मेथी, कोथिंबीर कवडीमोल

मात्र, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जळगावकरांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील नागरिक व राजकीय पक्षांनी रस्ते दुरुस्तीसाठी मोर्चे काढले. महासभेतही चर्चा झाली. आता तर शहरातील रस्त्यांचा प्रश्‍न विधिमंळातही पोचला. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत, तर आमदार सुरेश भोळे यांनी विधान सभेत शहरातील रस्त्यांचा प्रश्‍न उपस्थित केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील रस्त्यांची अवस्था ‘अमृत’ व ‘भुयारी’ गटारीच्या कामांमुळे झाल्याचे सांगितले. रस्त्यांसाठी शंभर कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे. ५८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे रस्त्यांसाठी पैसे आहेत हेच यावरून दिसून आले. प्रत्यक्षात कामे मात्र होताना दिसत नसल्याने जळगावकर त्रस्त झाले आहेत.

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Eknath Khadse Statement : भूखंड घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

मक्तेदाराचा पत्रांचा खेळ

महापालिकेतील रस्त्यांची कामे घेणारे मक्तेदार आणि बांधकाम विभाग यांचा केवळ पत्रांचा खेळ सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरातील रस्त्यांची कामे करणारे मक्तेदार अभिषेक पाटील यांनी शहरातील पाच रस्त्यांची कामे केली. मात्र, दोन रस्त्यांच्या कामावर अद्यापही सिलकोट बाकी आहे. रस्त्यांची कामे तत्काळ करावीत, यासाठी महापालिकेने त्यांना नोटीस बजावली असल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांनी दिली, तर मक्तेदार अभिषेक पाटील यांनीही महापालिकेला आपण काम करण्यास तयार असून, काही अडचणी सोडविण्यात याव्यात, असे पत्र दिले आहे. मात्र, या पत्रांच्या वादात रस्त्यांची कामे अडकली आहेत. जनता मात्र त्रस्त झाली आहे.

दूध फेडरेशन रस्त्याचे काम संथ

शासनाने शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी ४८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यातून शहरातील दहा रस्त्यांची कामे सुरू आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कामे मक्तेदाराला दिली आहेत. मात्र, या निधीतील रस्त्यांची कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. दूध फेडरेशन ते रेल्वेस्थानक रस्त्याचे काम एवढ्या संथगतीने सुरू आहे की नागरिकही आता या कामाला कंटाळले आहेत. दीड महिन्यापासून या रस्त्याचे काम सुरू आहे. मातीचे आणि खडीचे ढीग पडले आहेत. काही ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. दिवसभर केवळ रस्त्यावर एक जेसीबी फिरत असतो. काहीही काम त्या ठिकाणी होताना दिसत नाही. नागरिकांना या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊनच जावे लागत आहे. या ठिकाणी दुचाकी घसरून किरकोळ अपघात होत आहेत. या रस्त्याचे काम वेगाने करावे, यासाठी नागरिकांनी बांधकाम विभागाला निवेदनेही दिली आहेत. मात्र, या विभागाचे अधिकारीही या कामाकडे फिरकलेही नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम गतीने कधी होणार, असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

हेही वाचा: Jalgaon News : जन्मठेप शिक्षेतून 2 महिलांची खंडपीठाकडून निर्दोष मुक्तता