Latest Marathi News | अरूंद फरशांमुळे एरंडोल- येवला राज्यमार्ग बनला मृत्युचा सापळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Erandol - Yewla Highway

Jalgaon : अरूंद फरशांमुळे एरंडोल- येवला राज्यमार्ग बनला मृत्युचा सापळा

भडगाव : राज्य शासनाने 'हायब्रीड अन्युइटी' अंतर्गत एरंडोल-येवला राज्यमार्गाचे भाग्य उजाळले. मात्र त्यावरील अरूंद फरशांमुळे हा रस्ता वाहनधारकांच्या जीवावर उठला आहे. या रस्यावर अपघात कमी होण्याऐवजी प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या रस्त्याचे नव्याने सर्वेक्षण होऊन पुलांची उंची, अरूंद फरशी रूंदीकरणाची कामे हाती घेण्याची मागणी होत आहे.

एरंडोल ते येवला या राज्यमार्ग क्रमांक २५ ला 'हायब्रीड अन्युइटी'तून मंजुरी देत एरंडोल ते जळगाव जिल्ह्यात असलेल्या सायगाव (ता. चाळीसगाव) हद्दपर्यंत काम मंजूर केले.

मात्र या रस्त्याचे काम हाती घेताना सर्वेक्षणात अनेक छोट्या फरशीच्या रुंदीकरणाकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले. तर छोट्या पुलाच्या उंची चे कामही घेणे अपेक्षित असताना त्या कामांचा समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे रस्त्याची सुधारणा झाली असताना वाहनधारकांना अपघाना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.(Erandol Yewla State Highway has become a death trap due to narrow pavement Jalgaon news)

हेही वाचा: Unfit Luxury Bus : नाशिकच्या लक्झरी अग्नितांडवानंतर जिल्ह्यात कारवाई तीव्र

अरुंद फरशा उठल्या जिवावर

या राज्यमार्गावर वडजी ते भडगाव पेठ या पाच किलोमीटर अंतरात चार ठिकाणी अरूंद फरशा आहेत. मागे रस्त्याची रुंदी आहे. मात्र फरशीजवळ अचानक २ ते ३ फुटाने रुंदी कमी होते. त्यामुळे वाहन विशेषत: दुचाकी वाहनही फरशीच्या कठड्याला धडकले जातात. असे प्रकार रात्रीच्यावेळी जास्त प्रमाणात घडतात. एवढ्या कमी अंतरात वर्षभरात मोठे अपघात घेऊन काहींना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. तर काहींंना गंभीर अपघामुळे मोठ्या आरोग्य समस्येला जावे लागले आहे. वडजी ते पेठेपर्यंत वर्षभरात १० ते १० जणांचा या अरूंद फरशांवर अपघात झाला. हीच परिस्थिती पूर्ण सायगावपर्यंत पाहायला मिळते.

सुधारित सर्वेक्षण होणे गरजेचे

या रस्त्याचे काम पूर्णत्वास आले असले तरी शासनाने सुधारित सर्वेक्षण करून अरूंद फरशांचे रूंदीकरण, कमी उंचीच्या पुलाची रूंदी आणि उंची वाढदिवणे आवश्यक आहे. वडजी ( ता. भडगाव) येथील गावाजवळील नाल्यावरील फरशीची उंची ‘जैसे थे’ ठेवण्यात आली आहे. पावसाळ्यात जास्तीचा पाऊस झाल्याबरोबर तिच्यावरून पाणी वाहते. पर्यायाने वाहतूक पूर्णपणे खोळंबते. त्यामुळे येथे नव्याने पूल करणे आवश्यक होते. वास्तविक हा रस्ता बनल्याने या रस्त्यावरून वाहतूक वाढलेली आहे.

हेही वाचा: Jalgaon Muncipal Corporation : अमृत टप्पा 2.0 चा अहवाल सल्लागार नियुक्तीचा वाद

अवजड वाहनांना 'नो एंट्री'

एरंडोल - येवला राज्यमार्ग हा मालेगाव, नाशिक जाण्यासाठी सोयीचा अन् कमी अंतरचा मार्ग आहे. मात्र येथील अरुंद फरशा अन् पुलामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात शिवणी (ता. भडगाव) येथील जामदा डावा कालव्याच्या पुलामुळे अवजड वाहनांना विशेषत: जास्त उंचीच्या वाहनांना तिकडून जाणे शक्य नाही. त्यामुळे या रस्तावरून जणूकाही मोठ्या वाहनांना 'नो एंट्री' आहे. या भागात हा त्रास जास्त करून उसाच्या ट्रकना होताना पहायला मिळतो. त्यामुळे या समस्येला मार्ग काढणे अपेक्षित आहे. याबाबत आमदार किशोर पाटील यांनी हा राज्यमार्ग पिचर्डे गावामार्गे बात्सर -खेडगाव अशा पद्धतीने वळविण्याची मागणी शासनाकडे केली आहे, असे झाल्यास हा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

हजारो झाडे तोडली

एरंडोल - येवला राज्यमार्गाच्या रूंदीकरणात एरंडोल ते सायगावपर्यंत हजारो झाडे तोडण्यात आली. मात्र दोन वर्षे होत आलली तरी त्या बदल्यात राज्यमार्गाच्या कडेला झाडे लावण्यात आलेले नाहीत. वास्तविक डेरेदार वृक्ष तोडल्यावर नव्याने २ ते ३ पटीने वृक्षलागवड करणे आवश्यक होते. रस्त्याच्या कामात वृक्षलागवड होती का? असेल तर संबंधित ठेकेदाराने वृक्षलागवड का केली नाही? वृक्षलागवड नसेल अंदाजपत्रक त्याचा समावेश का केला नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वडजी गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला सर्व आब्यांची झाडे होती. त्यातून उत्पन्न सुरू होते. मात्र झाडे तोडल्यावर नव्याने वृक्षलागवड करण्यात आलेली नाही. वडजी ग्रामपंचायतीने बांधकाम विभागाकडे वारंवार याबाबत मागणी केली. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवडीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा: Jalgaon banana on postal Envelope : केळी हे तर खरे कल्पवृक्ष