नगरसेवकांचा फौजफाटा उतरला निवडणूकीच्या आखाड्यात; कुठे ? 

चेतन चौधरी 
Monday, 4 January 2021

प्रस्थापितांना हादरा बसून, नवीन चेहऱ्याना संधी मिळू शकते. यात सामाजिक समीकरणदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. 

भुसावळ : कंडारी हे गाव भुसावळ शहराला लागून असल्याने गावाच्या सीमेलगत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा नेहमीच गावात दबदबा राहिला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवर आजतागायत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. नगरसेवकाच्या या दबावतंत्र आणि फौजफाट्याला येथील भाजपचे डॉ. सूर्यभान पाटील, यशवंत चौधरी आणि सरपंचपती संदीप शिंगारे या ‘त्रिमूर्तीं’नी आव्हान दिल्याने, माजी आमदार संतोष चौधरी आणि आमदार संजय सावकारे समर्थकांमध्ये काट्याची लढत होणार आहे. 

आवश्य वाचा- रिअल इस्टेट सुसाट; विक्रमी दस्त नोंदणीसह २० कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत

 

भुसावळ शहराला लागून असलेले कंडारी हे गाव तालुक्यातील प्रमुख गावांपैकी एक आहे. एकूण बारा हजार मतदारसंख्या असलेल्या कंडारी येथे सहा वॉर्ड असून, यातून सतरा सदस्य निवडून येतात. यासाठी संपूर्ण गावातून ७४ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यात विशेष म्हणजे, तरुण उमेदवारांचा अधिक भरणा आहे. गावात वर्षानुवर्षे पाणीपुरवठ्याची समस्या कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रस्थापितांना हादरा बसून, नवीन चेहऱ्याना संधी मिळू शकते. यात सामाजिक समीकरणदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. 

नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची 
कंडारी गाव भुसावळ शहरातील रेल्वे उत्तर वॉर्ड परिसराला लागून असल्याने या भागात असलेल्या नगरसेवकांचा नेहमीच दबदबा गावात राहिला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत नेहमीच येथील नगरसेवकांचा हस्तक्षेप राहिला आहे. आतापर्यंत रेल्वे उत्तर वॉर्डात माजी आमदार संतोष चौधरी समर्थक नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यामुळे साहजिकच कंडारी ग्रामपंचायतीमध्ये देखील माजी आमदार चौधरींचे समर्थक ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे आणि ते कायम राहण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून देखील प्रयत्न केले जात असून, गावातील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. 

आवर्जून वाचा- एकनाथ खडसेंना खरच ‘कोरोना’झाला आहे का ? 
 

विकासकामांचा फायदा 
राष्ट्रवादीकडून माजी आमदार संतोष चौधरी यांचे समर्थक संतोष निसाळकर यांचे पॅनल, तर भाजपतर्फे आमदार सावकारे समर्थक डॉ. सूर्यभान पाटील, यशवंत चौधरी, संदीप शिंगारे, श्‍याम मोरे यांचे पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहे. यात आमदार संजय सावकारे यांनी गावात विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. गेल्या दोन वर्षांत गावात रस्ता काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक, भूमिगत गटारी आदींचे कामे झाली आहेत. याचा फायदा निवडणुकीत होऊ शकतो. 

समस्यांविरुद्ध एकाकी झुंज 
कंडारी ग्रामपंचायतीवर आतापर्यंत राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचेच निवडून आलेले आहेत. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात सरपंच योगिता शिंगारे यांसह राष्ट्रवादीचे काही सदस्य आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली भाजपत दाखल झाले. आतापर्यंत आमदार संजय सावकारे समर्थक असलेले ग्रामपंचायत सदस्य डॉ. सूर्यभान पाटील यांसह माजी उपसरपंच यशवंत चौधरी यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर आवाज उठवून एकाकी झुंज दिली आहे. 

एकूण मतदार १२ हजार 
वॉर्ड - सहा 
सदस्य संख्या - १७ 
प्राप्त झालेले उमेदवारी अर्ज : ७३  

 
संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election marathi news bhusawal councilors fighting election campaigns