
Indore Bus Accident : नवस फेडला, तरी देव रुसला!
अमळनेर (जि. जळगाव) : आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, यासाठी प्रत्येक जण देवाला नवस बोलतो. मात्र मानलेला नवस पूर्ण करूनही क्रूर काळ घाला घालत असेल, तर त्याला काय म्हणावे? ‘नवस फेडला, तरी देव रुसला’ अशीच गत इंदूर-अमळनेर बसचालक चंद्रकांत एकनाथ पाटील यांच्या कुटुंबाची झाली. पाटील-बाविस्कर कुटुंब आध्यात्मिक आहे. दत्तपंथीय असल्यामुळे त्यांनी जाळीचे देव येथील प्रभू दत्ताला बोललेला नवस फेडण्यासाठी गेल्या आठवड्यात चंद्रकांत पाटील आई-वडील, पत्नी, दोन्ही मुले व शेजारी असलेल्या जयश्री पाटील यांच्यासमवेत बसने गेले होते. त्यांनी नवस पूर्ण केला. तरीही क्रूर काळाने त्यांच्यावर झडप घातलीच. ‘नवस फेडला, मात्र देव रुसला’ असा दुःखद प्रसंग घडला. (Indore Bus Accident)
हेही वाचा: Indore bus accident : चालकाचं नियंत्रण सुटले अन्...; वाचा नेमकं काय घडलं
मूळचे चहार्डी (ता. चोपडा) येथील रहिवासी एकनाथ पंडित पाटील (बाविस्कर) अमळनेर पंचायत समितीत कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच ते निवृत्त झाले. ते दोन्ही पुत्र राकेश पाटील व चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत ढेकू रोडवरील गायत्रीनगरमध्ये राहतात. एकनाथ पाटील स्वतः चालक असल्याने तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी शासकीय वाहनावर चालक म्हणून त्यांना नियुक्ती दिली होती. त्यांचाच वारसा दोन्ही मुलांनी टिकवत दोघेही बस आगारात चालक म्हणून कार्यरत झाले. चंद्रकांत पाटील २०१२ मध्ये शहादा आगारात चालक म्हणून रुजू झाले. पाच वर्षांपूर्वीच ते अमळनेर आगारात बदली होऊन आले होते.
हेही वाचा: Indore Bus Accident : मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत; CM शिंदेंची घोषणा
आवडती ड्यूटीच बेतली जिवावर!
‘जो आवडे सर्वांना, तोचि आवडे देवाला’ या उक्तीनुसार अतिशय प्रेमळ असलेली, सर्वांना हवीहवीशी वाटणारी व्यक्ती ज्या वेळेस आपल्यातून निघून जाते, त्या वेळेस निश्चितच सर्वांना दुःख होते. बसचालक चंद्रकांत पाटील ऊर्फ बाळू (वय ३८) यांना नेहमीच अमळनेर-इंदूर ही बसफेरीची मागणी करायचे. एखादी आवडती गोष्टच अखेर त्या व्यक्तीच्या जिवावर बेतली अन् क्षणार्धातच ‘होत्याचे नव्हते झाले’. अखेर आवडती ड्यूटीच जिवावर बेतली. चंद्रकांत पाटील यांच्या मृत्यूची बातमी अमळनेरला आली आणि त्यांच्या घरी गर्दी झाली. विशेष म्हणजे त्यांच्या मृत्यूची वार्ता आई-वडील, पत्नी व मुलांपासून सायंकाळपर्यंत लपविण्यात आली होती. मात्र, ही वार्ता समजताच सर्वांनी हंबरडा फोडला. त्यांच्या मागे पत्नी दीपाली ऊर्फ धनश्री, मुलगी प्रांजली (वय ८), मुलगा गीतांशू (४), आई-वडील, भाऊ-भावजय, पुतणे असा परिवार आहे.
हेही वाचा: Indore Bus Accident: दुर्घटनेतील 12 मृतदेह हाती, सर्व मृतांची ओळख पटली
Web Title: Indore Msrtc Bus Accident Driver Death Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..