Jalgaon: मद्यपी आई-वडिलांच्या त्रासातून चिमुरडे मुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मद्यपी आई-वडिलांच्या त्रासातून चिमुरडे मुक्त

रावेर : मद्यपी आई-वडिलांच्या त्रासातून चिमुरडे मुक्त

रावेर : शहरात भटकंती करणाऱ्या गरीब मुलांना येथील सामाजिक कार्य करणाऱ्या युवकांनी पोलिस ठाण्याच्या माध्यमातून बालकल्याण समिती जळगाव येथे पाठविले. या कार्याचे सर्वत्र समाज मनातून कौतुक होत आहे.

सुमारे आठ ते दहा दिवसांपासून शहरातील छोरिया मार्केट, आजूबाजूच्या परिसरात दोन मुले व दोन मुली गावांत दिवसभर भीक मागून फिरताना निदर्शनास आले. रात्री महालक्ष्मी मंदिर परिसरात झोपतात. हे पाहून येथील सामाजिक कार्यकर्ते प्रणीत महाजन व त्यांच्या मित्रांनी गावांत भटकणाऱ्या लहान मुलांना भेटून त्यांची विचारणा केली. तीन ते सात वयोगटातील ही मुले येथील जुन्या सरकारी दवाखान्यामागे राहत असल्याची माहिती मिळाली.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या आई- वडिलांचा तपास केला असता, त्यांचे वडील रामसिंग पावरा व आई दारूच्या नशेत होते. ते नेहमी दारू सेवन करीत असतात. त्यांची मुले त्यांच्या मारहाणीच्या धाकाने गावात भिक मागत फिरतात. या मुलांनी भिक मागताना वाममार्गाला लागू नये, त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे. त्या मुलांना आई-वडील सांभाळ करायला तयार नसल्याचे दिसून आले. ही मुले रात्री- बेरात्री भटकतात.

या चारही लहान मुलांना, बालकल्याण समिती जळगाव येथे दाखल करण्यात यावे, याबाबतचा अर्ज येथील पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांना प्रणीत महाजन, दीपक जाधव, प्रफुल्ल महाजन, सचिन पाटील, सागर जगताप, तुषार महाजन, महेश चौधरी, लहू जाधव, गोलू मराठे, विक्रांत मराठे, शुभम मराठे, गोपाल पाटील, योगेश पवार, योगेश महाजन, जयेश महाजन, दुर्गेश मोपारी, राजेश महाजन, श्रीकांत जगताप, गोविंद मराठे, कपिल बिरपन, आदर्श मंगवानी यांनी आपले जवाब व स्वाक्षऱ्यासह दिला. त्यावरून कायदेशीर प्रक्रिया करून या बालकांना बालकल्याण समिती जळगाव येथे बुधवारी (ता. २४) रवाना करण्यात आले. या लहान मुलांना नवीन ड्रेस व केक कापून निरोप देताना सर्वांना गहीवरून आले. या युवकांनी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

loading image
go to top