Jalgaon: अवैध गौण खनिजमफियांचे ‘यमदूत’ सुसाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवैध गौण खनिजमफियांचे ‘यमदूत’ सुसाट

जळगाव : अवैध गौण खनिजमफियांचे ‘यमदूत’ सुसाट

जळगाव : भुसावळ- जळगाव राष्ट्रीय महामार्गावर तरसोद फाट्याजवळ सुसाट डंपरने महिलेस दुचाकीसह चिरडले. डंपरखाली मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या अंगातील गणवेश, प्रमाणपत्रावरून तिची ओळख पटली असून, त्या जिल्‍हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील परिचारिका प्रेरणा तायडे असल्याचे निष्पन्न झाले. अपघातग्रस्त डंपर ताब्यात घेत मृतदेह जिल्‍हा रुग्णालयात हलविण्यात आला.

शासनकर्त्यांसह लोकप्रतिनिधींचे बोटचेपी धोरण आणि जिल्‍हा प्रशासनाची हतबलता अवैध गौणखनिजांची लूट करणाऱ्या माफियांच्या पथ्यावर पडली आहे. त्यात पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे अवैध वाहतुकीसाठी महिन्याकाठी गोळा होणारा लाखो रुपयांचा ‘हप्ता’ जनसामान्यांच्या जिवावर उठला आहे.

हेही वाचा: ममतांचे आमंत्रण मोदींनी स्वीकारले

मंगळवारी (ता. २३) शिवकॉलनी स्टॉपवर उभ्या रिक्षावर सुसाट वाळू ट्रॅक्टर चढले, तर दुसरीकडून मुरूम वाहतूक करणारे ट्रॅक्टरने या रिक्षाला चिरडले. या घटनेस अवघे २४ तास उलटत नाही, तोवर जळगाव- भुसावळदरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद फाट्यावर अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या सुसाट डंपरने (एमएच १९, वाय ७७७३) स्कूटीस्वार (एमएच १९, डीसी ५३९६) महिलेस चिरडले. ही घटना बुधवारी (ता. २४) दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती कळताच पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, सहाय्यक फौजदार अलियार खान, हसरत सय्यद, लिना लोखंडे घटनास्थळावर दाखल झाले. डंपर सोडून फरारी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मिलिंद बाळू धनगर (वय २०, रा. कासवा, ता. यावल) असे चालकाचे नाव आहे. जप्त डंपर ममुराबाद रोडवरील भूषण चौधरी याच्या मालकीचा असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

मागून येत चिरडले

प्रेरणा तायडे स्कूटीवरून समान्य वेगातच जात होत्या. रस्त्याच्या साइडपट्टीवर दुचाकी असताना मागून सुसाट आलेल्या डंपरने दुचाकीसह प्रेरणा यांना चिरडून टाकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

गणवेशावरून पटली ओळख

डंपरने चिरडल्यानंतर मृतदेह ट्रक खालून ओढून काढण्यात आला. मृत महिलेच्या अंगात पांढरा ॲप्रन आणि गणेवश होता. ओळखपत्रावरून प्रेरणा तायडे यांची ओळख पटली.

तत्काळ पेालिसांनी जिल्‍हा रुग्णालयात घटनेची माहिती दिल्यानंतर मुख्य अधीसेविका प्रणीता गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळाकडे धाव घेतली.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

कुटुंबासह सहकाऱ्यांचा आक्रोश

प्रेरणा देविदास तायडे कंडारी (ता. भुसावळ) येथून रेाज अप-डाउन करीत होत्या. त्याचे पती अमोल सपकाळे वरणगाव ऑर्डिनन्स फॅक्टरीत आहे.

त्यांच्या पश्चात मुलगा अन्वीत (वय ४) आई-वडील, सासू- सासरे आहेत. अपघाताची माहिती कळताच जिल्‍हा रुग्णालयातून त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि भुसावळकडून कुटुंबीयांनी धाव घेतली. प्रेरणा यांचा मृतदेह पाहताच सहकाऱ्यांसह कुटुंबीयांनी प्रंचड आक्रोश केला.

कर्तव्यतत्पर प्रेरणा हरपली..!

प्रेरणा सात वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात एनआयसीयूत अधीसेविका म्हणून कार्यरत होत्या. कोविड काळात एकावेळेस कोरोना आणि बालरुग्ण विभाग अशा देान्ही ठिकाणी त्यांनी न थकता, कुठल्याही सुट्या न घेता सेवा दिली. नेहमी हसतमुख असणाऱ्या प्रेरणा तायडे कामात जशा परिपूर्ण होत्या, तशाच त्या कुटुंबवत्सलही असल्याचे सांगताना त्यांच्या सहकाऱ्यांना हुंदके अनावर झाले होते.

loading image
go to top