Jalgaon: रस्त्यांची कामे सुरू होण्याबाबत वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यांची कामे सुरू होण्याबाबत वाद

जळगाव : रस्त्यांची कामे सुरू होण्याबाबत वाद

जळगाव : ‘चांगला रस्ता दाखवा अन्‌ बक्षीस मिळवा’, असे अवाहन केल्यास जळगाव शहरात अगदी ते दाखविण्यासाठी रस्ता शिल्लक नाही. जळगावकर अगदी त्रस्त झाले आहेत. पावसाळा संपल्यावर आम्ही काम सुरू करणार, अशी ग्वाही महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने दिली होती. मात्र, अद्यापही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे शहरातील रस्त्याचे भाग्य कधी उजळणार, असा प्रश्‍न आता जनता विचारीत आहे. दुसरीकडे शहरातील रस्त्याच्या कामावरूनच आता वाद सुरू झाले आहेत. प्रभागातील रस्त्याचा निधी सत्ताधारी नेत्यांनी दुसऱ्या भागातील रस्त्यांसाठी वळविल्याचा आरोप नगरसेवक करीत आहेत.

जळगाव शहरात विविध योजनांसाठी रस्ते खोदले आहेत. रस्त्याची अगदी चाळणी झाली आहे. कोणत्याही भागात चालण्यासाठी चांगले रस्ते नाहीत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रोज अपघात होत आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील रस्ते दुरुस्त कधी होणार, याची जळगावकरांना प्रतिक्षा आहे. मात्र, अद्याप महापालिकेने कुठेही काम सुरू केलेले नाही.

हेही वाचा: ममतांचे आमंत्रण मोदींनी स्वीकारले

पावसाळ्याआधी नियोजन.. पण

शहरात सर्व रस्त्यांची कामे करण्यासाठी महापालिकेने पावसाळ्याअगोदर नियोजन केले होते. त्यासाठी ५० कोटी रुपयांचे नियोजन केले असल्याचे सत्ताधाऱ्यातर्फे सांगण्यात आले होते. पावसाळ्यानंतर प्रत्येक प्रभागनिहाय रस्त्यांची कामे करण्यात येतील, असेही सांगण्यात येत होते.

आता कामे सुरू कधी होणार?

पावसाळा आता संपला आहे. मात्र, महापालिकेतर्फे अद्यापही रस्त्यांची कामे सुरू झालेली नाहीत. जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. याच पाश्‍र्वभूमीवर आता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने मक्तेदारांना आदेश देऊन प्रत्येक प्रभागनिहाय रस्त्यांची कामे सुरू करावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जळगावातील जनता त्रस्त झाली आहे. पावसाळ्यानंतर कामे सुरू करू, अशी घोषणा सत्ताधाऱ्यांनी केली होती. आता पाऊस थांबला आहे. तरीही त्यांनी काम सुरू केलेले नाही. त्यामुळे रस्त्यांची कामे सुरू न केल्यास भाजपतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.

-दीपक सूर्यवंशी, महानगराध्यक्ष, भाजप, जळगाव महानगर

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

भाजपच्या काळात निधीचे नियोजन व्यवस्थित झाले नव्हते. प्रभागातील रस्ते त्यात घेतले होते. त्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, ते लक्षात येत नाहीत. त्यामुळे महापौर झाल्यानंतर आपण शहरातील प्रमुख रस्त्यांचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या निविदा काढल्या आहेत. एक महिन्यात शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांची कामे सुरू होतील.

-जयश्री महाजन, महापौर, जळगाव

शहरातील रस्त्यांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना तब्बल ८० कोटींचा निधी दिला. मात्र, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, गटनेते नितीन लढ्ढा यांच्या वॉर्डात सर्वांत जास्त निधी वापरला गेला. मात्र, इतर प्रभागाला कोणताही निधी दिला नाही. त्यामुळे प्रभागातील मुख्य रस्ते व इतर रस्त्यांची कामे होत नाहीत.

-नवनाथ दारकुंडे, नगरसेवक, भाजप बंडखोर

loading image
go to top