Bravery Award : करणच्या दारिद्र्याला शौर्याची झालर; राष्ट्रीय बालवीरता पुरस्काराचा मानकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

karan tadavi

Bravery Award : करणच्या दारिद्र्याला शौर्याची झालर; राष्ट्रीय बालवीरता पुरस्काराचा मानकरी

पाचोरा (जि. जळगाव) : गरिबी आणि दारिद्र्य कोणत्याही यशाच्या व शौर्याच्या आड येत नाही, याची अनेक उदाहरणे आपण पाहतो, ऐकतो अथवा अनुभवतो देखील. असाच काहीसा प्रकार चिंचपुरे (ता. पाचोरा) येथील करण बाळू तडवी या युवकाच्या बाबतीत घडला असून, कुटुंबाचे अठरा विश्व दारिद्र्य असताना करणने पुराच्या पाण्यात उडी मारून दोघांचे प्राण वाचवले होते. (karan tadvi won national child bravery award for saving drifting people flood waters jalgaon news)

त्याच्या या शौर्य व धाडसामुळे राष्ट्रीय बालवीरता पुरस्कारासाठी करणची निवड झाली. हा वीरता पुरस्कार स्वीकारण्यासाठी ऊसतोडणीचे काम सोडून करण दिल्लीला रवाना झाला आहे. चिंचपुरे येथील तडवी कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून नव्हे तर पिढ्यान् पिढ्या ऊसतोड मजुरीचे काम करतात.

या कुटुंबातील बाळू तडवी यांचा मुलगा करण याने देखील कुटुंबाचे दारिद्र्य पाहून या दारिद्र्याला आर्थिक मदतीचा ठिगळ लावता यावा म्हणून नववीपासून शाळा सोडली व तो देखील राज्यभर आपल्या कुटुंबीयांसमवेत ऊसतोड मजूर म्हणून फिरू लागला. ऊसतोड केल्यानंतर उसाची थोडीफार बांडी विकून तसेच मजुरीचा पैसा मिळवून हे कुटुंबीय आपला चरितार्थ चालवते.

वर्षभरातून सुमारे सात ते आठ महिने गाव सोडूनच राहावे लागते व कमावलेला पैसा घरी येऊन चार महिने उदरनिर्वाहासाठी वापरून पुन्हा ऊसतोड कामासाठी हे कुटुंबीय मार्गस्थ होते. गेल्या अनेक वर्षांपासून अशीच त्यांची वाटचाल सुरू आहे. परंतु करणने आपल्या दारिद्र्याला शौर्याची झालर लावण्याचे महत् कार्य केले व तो खऱ्या अर्थाने शौर्याच्या श्रीमंतीने चकाकला आहे.

राष्ट्रीय बालवीरता पुरस्कार २०२० चा करण मानकरी ठरला. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी करण दिल्ली येथे आहे. परंतु ऊसतोड मजूर असलेल्या आई, वडील, भाऊ, बहिणींना हा आनंद द्विगुणितही करता येत नाही.

दिल्लीला मुलाच्या शौर्य पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती देऊन हा सोहळा डोळे भरून पाहणे हे आई, वडिलांच्या व कुटुंबीयांच्या नशिबी नाही. दिल्लीला जाणे सोडा, परंतु आपल्या घरी येण्याइतपतही त्यांची आर्थिक परिस्थिती नाही. करणने काहीतरी केले. त्यामुळे त्याला काहीतरी मिळाले. एवढेच त्याच्या कुटुंबीयांना ठाऊक आहे.

सोशल मीडियातून शौर्य आले जगासमोर

करणचे शौर्य निवृत्त सैनिक समाधान पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजापुढे आणले. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुभाष देसले यांनी राष्ट्रीय बालविरता पुरस्काराचा करण खरा मानकरी आहे, असा विचार करून त्यांनी या पुरस्कारासाठीची सर्व कागदपत्रे मिळवून प्रस्ताव सादर केला. त्या आधारे करणची २०२० च्या राष्ट्रीय बालविरता पुरस्कारासाठी निवड झाली होती.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Jalgaon News : तृणधान्यमुळे राहाल व्याधींपासून दूर; मान्यवरांनी सांगितले तृणधान्याचे महत्त्व

‘कोरोना’मुळे रखडले पुरस्कार वितरण

या पुरस्कारांचे वितरण कोरोना महामारीमुळे रखडले होते. आता हा पुरस्कार वितरण सोहळा दिल्ली येथे होत असून, आपल्या शौर्याचा सन्मान स्वीकारण्यासाठी करण दिल्लीत पोचला आहे.

तडवी कुटुंबीयांच्या दारिद्र्याला शौर्याची झालर करणने लावली असून, त्याची ही शौर्याची श्रीमंती त्याच्या दारिद्र्यावर मात करणारी ठरली आहे. करणने आपले हे शौर्य व धाडस असेच कायम राखावे किंबहुना ते द्विगुणित करावे ही अपेक्षा.

पुरात उडी घेऊन दोघांना वाचविले

करण आपल्या गावी आला असताना १९ सप्टेंबर २०१९ ला पाचोरा तालुक्यातील बहुळा नदीला प्रचंड पूर आला. हा पूर पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या पुराच्या पाण्यात जलालुद्दीन तडवी व छोटू पाटील हे दोघे पाय घसरून पडले व पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहू लागले.

तेथे उपस्थितांनी प्रचंड आरडाओरड केली, पण करणने मात्र आरडाओरड न करता कोणत्याही गोष्टीचा विचार अथवा जिवाची पर्वा न करता करणने पुराच्या पाण्याच्या प्रवाहात उडी घेतली व त्याने वाहून जाणाऱ्या दोघांना मोठ्या कौशल्याने नदीकाठी आणून दोघांचे जीव वाचवले.

हेही वाचा: Jalgaon News : ‘मविआ’कडून उपेक्षा, शिंदे सरकारकडून अपेक्षा : प्रा. जोगेंद्र कवाडे