
Leopard Attack News : बिबट्याच्या हल्ल्यात मजूर गंभीर जखमी; गाईचा फडशा
Jalgaon News : कुरंगी येथील शेतशिवारात बिबट्याने अल्पभूधारक शेतकऱ्याच्या गाईचा फडशा पाडला असून, शेतात काम करणाऱ्या तरुण मजूर हल्ला करून त्याला जबर जखमी केले. तरुणाने आरडाओरड केल्याने त्याचा जीव वाचला. (Laborer seriously injured in leopard attack jalgaon news)
शुक्रवारी (ता.२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास युवराज राजधर पाटील (रा. कुरंगी) या शेतकऱ्याच्या गट क्रमांक ३८४/२ ) या शेतात दोन गाई, दोन बैल सावलीत झाडाखाली बांधलेले होते. दरम्यान, बिबट्या गाईचा फडशा पाडत असताना शेतकरी युवराज पाटील शेतात जाताच बिबट्याने तिथून पळ काढला.
शेजारील आप्पा तापीराम पाटील यांच्या लिंबूच्या शेतात घुसला. तेथे शेतात काम करणारा राजेश बापू लोहार (वय २६) त्याच्या मित्रासोबत शेळीचा चारा काढत असताना बिबट्याने त्या तरुणावर जोरदार हल्ला चढवला. त्या हल्ल्यात राजेश लोहार याच्या चेहऱ्यावर पंजा मारून त्याच्या दोन्ही हातांना चावा घेतला. सोबत काम करणारे मित्र असल्याने त्यांनी जोरात आरडाओरड केल्याने बिबट्याने तिथून पळ काढला.
या जीवघेण्या हल्ल्यात राजेश जबर जखमी झाला असून, त्याला उपसरपंच शालिग्राम पाटील, सदस्य अविनाश कोळी, तंटामुक्तीचे अध्यक्ष नामदेव पाटील, अजय जयस्वाल यांनी जखमी अवस्थेत नांद्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. कुरंगी येथील सरपंच सीमा पाटील यांनी पाचोरा वन विभागाशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क करून या घटनेची माहिती दिली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तत्काळ वनपरीक्षेत्र अधिकारी अमोल पंडित, वनपाल पी. बी. देवरे, वनरक्षक प्रकाश सूर्यवंशी, वाहनचालक सचिन कुमावत यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी मजुराची विचारपूस करून घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली. पंचनामा करण्यासाठी वन विभागाचे पथक सोनटेक शिवारात पंढरीनाथ पाटील, गणेश पाटील, अविनाश कोळी, सागर मोरे यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला.
हिंस्त्र प्राण्यांचे हल्ले सुरूच
दरम्यान, चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे- दरेगाव रस्त्यावरील शेतातील खळ्यात शेळ्यांवर गेल्या आठवड्यात हिंस्त्र प्राण्याने हल्ला करून दोन शेळ्या ठार केल्या होत्या. त्यानंतर दरातांडा (ता. चाळीसगाव) येथेही तीन शेळ्यांचा फडशा पाडला. या परिसराच बिबट्या असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यातच आता पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथेही बिबट्याने हल्ला चढविल्याने ग्रामस्थांसह शेतकरी भयभीत झाले आहेत.
वन विभाग पिंजरा लावणार
दरम्यान, शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून ज्या ठिकाणी जनावरांचा फडशा पाडला आहे, त्या ठिकाणी रात्री वन विभागाकडून पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनपाल पी. बी. देवरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.