Latest Marathi News | जळगाव : तरुणाचा भादलीच्या शेतात खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

जळगाव : तरुणाचा भादलीच्या शेतात खून

जळगाव : नशिराबाद (ता. जळगाव) जवळील कडगाव फाट्याजवळ सकाळी रक्ताच्या थारेाळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांना माहिती दिली. त्यावरून अप्पर पोलिस अधीक्षक, डीवायएसपी, गुन्हे शाखेसह विविध पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला. संदेश लिलाधर आढाळे (वय २२, रा. डोंगरकठोरा, ता. यावल, ह.मु. भादली) असे मृताचे नाव आहे. (Latest Marathi News)

भादली येथील संदेश लिलाधर आढाळे आईवडिलांसह वास्तव्याला आहे. जळगावात एका खासगी फायनान्स कंपनीत तो कामाला होता. संदेशचे वडील खासगी वाहनचालक असून, ते नाशिकला राहतात. बुधवारी (ता. १०) सकाळी संदेशचा मृतदेह नशिराबाद पोलिस हद्दीतील कडगाव रस्त्यावरील पाटचारीत शेतात आढळून आला. या घटनेचे वृत्त जंगलातील वणव्यासारखे पसरल्याने जवळपासच्या गावातील ग्रामस्थांसह तरुणांची घटनास्थळी गर्दी उसळली. नशिराबादचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, सहाय्यक फौजदार अलियार खान, समाधान पाटील, किरण बाविस्कर, संजय जाधव, बाळू पाटील यांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली.

ग्रामस्थांनी मृत तरुणाची ओळख पटविल्यावर त्याच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्‍हा रुग्णालयात रवाना करण्यात आला. मृताच्या पोटावर, डोक्यावर वर्मी घाव बसल्याने त्याचा मृत्यू झाला असून, गुन्हेशाखेच्या पथकाने त्याच्या परिचितांची चौकशी सुरू केली असून, काहींना ताब्यातही घेतले आहे. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. मृताच्या मागे वडील लिलाधर राघो आढाळे, आई छाया आणि विवाहित बहीण आहे.

प्रेमसंबधातून घातपात?

लिलाधर आढाळे याचा मृतदेह आढळल्यावर चौकशीसाठी भादली येथील काही ग्रामस्थांना आणि मृताशी संबंधित असलेल्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. संदेश आढळे अविवाहित असून, प्रेमसंबधातून हा खून झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :JalgaonCrime News