चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यास मरेपर्यंत जन्मठेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime news

चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यास मरेपर्यंत जन्मठेप

जळगाव : बिलाखोड (ता. चाळीसगाव) येथील कापूस वेचणी मजूर दांपत्याच्या आठवर्षीय मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधमास जिल्‍हा न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठेाठावली. पीडितेने तिच्या बाळबोध शब्दात अत्याचाराचा पाढा न्यायालयात वाचला अन्‌ गोरख ऊर्फ बापू भीमराव सोनवणेविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला.

खटल्याची पार्श्वभूमी अशी ः चाळीसगाव तालुक्यातील बिलाखेडा शिवारात कापूस वेचणीचे काम सुरू असल्याने वेचणी मजुरांनी याच ठिकाणी तात्पुरत्या झोपड्या टाकून बस्तान मांडले होते. या झोपडीतच आठवर्षीय चिमुरडी तिच्या लहान भावंडांसह खेळत होती. आई-वडील कापूस वेचणीसाठी गेले असल्याने (१० ऑक्टोबर २०२०) गोरख ऊर्फ बापू भीमराव सोनवणे-भिल्ल (वय २२) याने पीडितेस तुझ्या वडिलांनी तुला शेतात बोलावल्याचे सांगत दुचाकीवर बसवून जवळच जंगलात निर्जन ठिकाणी नेऊन मारहाण केली. तसेच तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. कुणाला सांगितले तर ठार करण्याची धमकी दिली होती.

हेही वाचा: महिलेस मावशी म्हटल्याने प्रैाढास बेदम मारहाण

आई परतल्यानंतर घटना समोर

पीडितेची आई घरी परतल्यावर तिच्या गालावर मारल्याची खूण पाहून तिने मुलीला विश्वासात घेत विचारपूस केल्यावर गंभीर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चाळीसगाव पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात येऊन संशयिताला अटक करण्यात आली. तपासाधिकारी उपनिरीक्षक भामरे यांनी वेळेत तपास पूर्ण करून दोषारोप न्यायालयात दाखल केले. न्या. डी. एन. खडसे यांच्या न्यायालयात कामकाज होऊन गुरुवारी शिक्षेवर सुनावणी झाली.

असे कलम, अशी शिक्षा

कलम ३६६ : १० वर्षे सश्रम कारावास, पाच हजार दंड

कलम ३६३ : ५ वर्षे सश्रम कारावास, पाच हजार दंड

कलम ३७६ (अ, ब) : ७ वर्षे सश्रम कारावास, तीन हजार दंड

कलम ३७६ (फ) : उर्वरित नैसर्गिक आयुष्याचा कारावास (मरेपर्यंत जन्मठेप)

बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (३ अ, ४, ५ एमएन, ६) : १७ वर्षे शिक्षा (१०+७) पाच हजार दंड

पीडितेने मांडला घटनाक्रम

घटना घडली तेव्हा पीडिता आठ वर्षांची होती. खटल्याच्या कामकाजात साधारण २० महिने लागले. पीडितेची आई फिर्यादीसह तपासाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पंच अशा नऊ साक्षी सरकारी अभियोक्ता ॲड. नीलेश चौधरी यांनी नोंदवून घेतल्या. त्यात चिमुरडीची साक्ष नोंदविताना आरोपीस ओळखले, त्याने केलेल्या कृत्याचे बाळबोध शब्दात मांडलेला घटनाक्रम अन्‌ अत्याचार उपस्थितांच्या अंगावर काटा उभा करणारा होता.

हेही वाचा: स्वस्त सोने खरेदीचे आमिष पडले महागात; दाम्पत्याला साडेचार लाखांचा चुना

डोळे वटारून दिली पोझ

घटनेच्या काही दिवस आधीच आरोपी गोरख सोनवणे याचे लग्न झाले होते. मात्र, बायको त्याच्या त्रासाला कंटाळून माहेरी निघून गेलेली असताना त्याने चिमुरडीवर अत्याचार केला. त्याच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर भीती तर सोडाच, मात्र काळजी, चिंता, खिन्नता असे कुठलेच भाव नव्हते. फोटोसाठी त्याने चक्क डोळे वटारत पोझ दिली.

Web Title: Life Imprisonment For The Perpetrator Sexual Assault With Minor Girl Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonCrime News
go to top