
जळगाव : विकृत ‘सिरीयल किलर’ला आजन्म सश्रम कारावास
जळगाव : भोकर (ता. जळगाव) येथील अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा खून केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपी यश ऊर्फ गोलू चंद्रकांत पाटील (वय २६) याला मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची शिक्षा ठोठावली. विकृत मनोवृत्तीच्या या आरोपीने यापूर्वीही असेच गंभीर गुन्हे केले असून, त्यांची कबुलीही तपासात दिली होती. (Life imprisonment of a perverted criminal in jalgaon)
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, की डांभुर्णी (ता. यावल) गावातील मुलीचे लग्न भोकर गावातील मुलाशी १२ मार्च २०२० ला गावात लागणार होते. त्यादिवशी मुलीकडून आलेल्या पाहुण्यात आरोपी यश ऊर्फ गोलू चंद्रकांत पाटील (वय २६) हाही भोकर गावी आला होता. तेव्हा त्याची गावातील ११ वर्षीय अल्पवयीन मुलाशी ओळख होऊन त्याला तो गावातील शेतात संडासला जायचे, म्हणून घेऊन गेला. तेथे त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य करून त्या मुलाला मारून टाकले होते. पीडित बालकाच्या पालकांनी तालुका पोलिसांत तक्रार दिल्यावरून अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. दाखल गुन्ह्यात तत्कालीन यावल पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेशाखेच्या पथकाने गुप्त माहितीवरून शेतातून यशला अटक केली हेाती. या गुन्ह्याचा उलगडा होऊन संशयिताने इतर गुन्ह्यांची कबुली दिली होती. तीन महिन्यांत गुन्ह्याचा तपास पूर्ण करून तालुका पोलिसांनी १० जून २०२० ला दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी न्यायाधीश एस. जी. ठुबे यांच्या न्यायालयात सुरू होती.
हेही वाचा: जळगाव : माहेरवाशिणीचा हुंड्यासाठी छ्ळ; गुन्हा दाखल
बर्फाच्या गोळ्याची गाडी अन्...
आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होण्यासाठी जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. केतन ढाके यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. ठुबे यांच्या न्यायालयात एकूण १२ साक्षीदारांच्या साक्ष नोंदवून घेतल्या. यात प्रामुख्याने मृत बालकाला बर्फाच्या गोळ्याच्या गाडीवरून घेऊन गेल्याने त्या दिवशी बर्फाचा गोळा विकणारा अनिल भोई यानेच संशयितासोबत जाताना पीडित बालकास शेवटचे बघितले होते. तसेच त्याला न्यायालयातही ओळख परेडमध्ये अचूक ओळखले होते. त्यासोबतच डॉ. नीलेश देवराज, तहसीलदार लक्ष्मण सातपुते व इतर पंचांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या.
दंडासह आजन्म कारावास
जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. केतन ढाके यांच्या प्रभावी युक्तिवादात मांडलेल्या सर्व पुराव्यावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. ठुबे यांनी आरोपीला दोषी ठरवून त्यास अल्पवयीन पीडित मुलांवरील अनैसर्गिक अत्याचार करून खून केल्याप्रकरणी आजन्म (मरेपर्यंतची) सश्रम कारावास व १ लाख १५ हजारांचा दंडाची शिक्षा सुनावली.
हेही वाचा: जळगाव : महिनाभरात ४४१ जणांना भटक्या कुत्र्यांचा चावा
विकृत मनोवृत्तीचा प्रत्यय
आरोपी यश पाटील वासनांध मनोविकृत झाला होता. तो लहान बालकांवर अनैसर्गिक अत्याचार करायचा. बालकांना खाऊचे आमिष दाखवून त्यांना निर्जनस्थळी न्यायचे, त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करायचे आणि त्यानंतर हा प्रकार कोणाला कळू नये, म्हणून त्यांची निर्घृणपणे हत्या करायची, अशी आरोपी यशची गुन्हा करण्याची पद्धत होती. ती पोलिस तपासात समोर आली. त्याचप्रमाणे त्याच्यावर भडगाव येथील बालकाच्या खुनाचाही संशय होता.
Web Title: Life Imprisonment Of A Perverted Criminal Jalgaon Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..