महापालिका आयुक्त डॉ. विद्याबाई जोरात..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon municipal commissioner Vidya Gaikwad

महापालिका आयुक्त डॉ. विद्याबाई जोरात..!

''जळगाव महापालिकेच्या पहिल्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच श्रीमती विद्या गायकवाड यांनी कामांचा धडकाच लावला आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी वेळेचे बंधन न पाळण्याऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करीत त्यांना शिस्तीचे धडे दिले. अपूर्ण कामे पूर्ण करण्याबाबत मक्तेदारांना तंबी दिली. ‘वॉटरग्रेस’ ‘अमृत’ या मक्तेदारांनीही समज दिली. त्यांच्या कामांचा धडका पाहून जळगावकर थक्क असून, सध्यातरी त्यांच्या या धडाकेबाज कामांमुळे नागरिक ‘आयुक्त विद्याबाई जोरात’, असेच म्हणत आहेत.'' - कैलास शिंदे

जळगाव महापालिका आयुक्तपद म्हणजे तारेवरची कसरत, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांत म्हटले जाते. आतापर्यंत नियुक्त झालेल्या आयुक्तांच्या कामकाजावरून ते दिसूनही येत आहे. कधी आयुक्त आणि सत्ताधाऱ्यांचे खटके उडाले, तर कधी दोघांची गाडी रूळावर असली, तरी शासनाकडून येणाऱ्या निधीचा प्रश्‍न निर्माण झाला. काही आयुक्त केवळ आपल्या सेवानिवृत्तीसाठी जळगाव महापालिकेवर नियुक्तीसाठी आले होते, असेही म्हटले जाते. महापालिका आयुक्त डॉ. सतीश कुळकर्णी निवृत्त झाल्यानंतर जळगाव महापालिकेचे आयुक्त कोण होणार, याबाबत चर्चा होती. जळगाव शहरातील सध्या कामकाजाची स्थिती पाहता, पुन्हा सेवानिवृत्ती जवळ आलेले आयुक्त नियुक्त करू नयेत, असाही सूर नागरिकांमधून व्यक्त होत होता. तर धाडसी अधिकारी नियुक्त करावेत, असेही अनेकांचे मत होते. शासनाने जळगाव शहराच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती विद्या गायकवाड यांचीच आयुक्तपदी नियुक्ती केली आणि जळगाव महापालिकेच्या त्या पहिल्या महिला आयुक्त झाल्या आहेत.

हेही वाचा: जळगाव शहरात विजेचा लपंडाव; महावितरण कार्यालयातील दूरध्वनी व्यस्त

परभणी जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या श्रीमती विद्या गायकवाड यांचा जन्म एका सर्वसाधारण कुटुंबात झाला आहे. त्यांनी बीएचएमएस ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेतली आहे. राज्य सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नांदेड महापालिकेच्या उपायुक्त म्हणून त्यांची पहिली नियुक्ती झाली. त्यानंतर परभणी महापालिका उपायुक्त, तर उदगीर व जळगाव जिल्ह्यातील अमळनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी म्हणून त्यांनी तीन वर्षे कार्य केले. त्यानंतर त्यांची जळगाव महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तपदावर वर्षभरापूर्वी बदली झाली.
जळगाव महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करताना त्यांना जळगाव शहरातील प्रश्‍न चांगले माहिती झाले. आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच त्यांनी थेट कामांचा धडकाच लावला आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून लेटलतीफ कर्मचारी व अधिकाऱ्यांना धडा शिकविला. जळगाव शहरातील रस्त्याच्या स्थितीची त्यांना माहिती आहे. त्यामुळे मक्तेदारांना त्यांनी पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याची तंबी दिली. रस्त्यांचे काम झाल्यानंतर पुन्हा रस्ता खोदावा लागू नये, यासाठी रस्त्याची कामे होण्याअगोदर ‘अमृत’ योजनेचे नळकनेक्शन जोडून देणे, असे आदेश मक्तेदारास दिले आहेत. झालेले रस्ते पुन्हा खोदले तर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही त्यांनी दिली.

हेही वाचा: आईच्या शेतावरून पेटली भावंडात ‘भाऊबंदकी’; नातवाने गमावले प्राण

जळगाव शहरात दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी आल्यानंतर त्यांनी थेट महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रास तातडीने भेट देऊन पाहणी करून काय अडचण आहे, याची माहिती घेतली व ती तातडीने दूर केली. शहरात शुद्ध पाणीपुरवठा सुरू केला. नगररचना विभागाचे काम नेहमीच वादात असते. परवान्यासंदर्भात त्यांनी ‘क्रेडाई’च्या माध्यमातून बांधकाम व्यवसायिक व नगररचना अभियंत्यांची भेट बैठक घेऊन परवाने देण्याबाबत नियमही जाहीर केले. प्लॅस्टिक बंदीबाबत केवळ आदेश देऊन त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी थेट रस्त्यावर उतरून कारवाई सुरू केली आहे. प्रारंभीच त्यांनी आपल्या कामाचा वकूब निर्माण केला आहे. त्यांच्या या कामांच्या धडाक्यामुळे जळगावकर समाधानी आहेत. मात्र, त्यांनी हाच धडाका दाखवित शहरातील रस्ते, स्वच्छता, आरोग्य सेवा सुधारल्यास नागरिक निश्‍चितच त्यांच्या कामांचे कौतुक करतील. मात्र, कामे करताना अनेक खाचखळगेही असतील. मात्र, प्रशासनातील अनुभवामुळे निश्‍चित त्याला ते बाजूला करतील, हे त्यांच्या कामावरून दिसून येत आहे. त्यामुळे सध्य तरी त्यांच्या कार्यास ‘डॉ. विद्याबाई जोरात’ म्हणून शुभेच्छा देऊया!

Web Title: Marathi Article On Jalgaon Municipal Commissioner Vidya Gaikwad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top