esakal | पहाटे तीनला शेकोटीवर; संस्‍काराचे बोल टोचले म्‍हणून जीव जाईपर्यंत मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon crime

घरातून पहाटे साडेतीनला धुळे येथे जाण्यासाठी निघाले होते. रस्त्यावर शेकोटी पेटलेली होती. दोघे दारूच्या नशेत असल्याने कुंझरकरांनी त्यांना संस्काराचे डोस पाजण्यास सुरवात केल्यावर खटके उडाले. वाद होऊन शिवीगाळ झाल्यावर कुंझरकर निघून गेले. 

पहाटे तीनला शेकोटीवर; संस्‍काराचे बोल टोचले म्‍हणून जीव जाईपर्यंत मारहाण

sakal_logo
By
रईस शेख

जळगाव : किशोर पाटील-कुंझरकर जिल्‍हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक. त्यात आदर्श शिक्षक. सवयीप्रमाणे आनोळखी व्यक्तीशीही बोलून-चालून वागण्याचा स्वभाव. घटनेच्या प्रसंगी पहाटे कुंझरकर धुळ्याला जात असताना एरंडोल-धरगाव फाट्यावर एका शेकोटीवर हात शेकताना, दोन तरुणांना दारूवर दिलेले प्रवचन दोघांना पचनी पडले नाही. त्यातूनच खटके उडून मारहाणीत कुंझरकरांचा मृत्यू झाला. 
मुख्याध्यापक कुंझरकर घरातून पहाटे साडेतीनला धुळे येथे जाण्यासाठी निघाले होते. एरंडोल-धरणगाव चौफुलीवर रस्त्यावर शेकोटी पेटलेली होती. तेथे जाऊन ते थोडा वेळ बसले. शेकोटीवर पूर्वीपासूनच वाल्मीक पाटील- देवरे (वय ३२, रा. सोनबर्डी), आबा पाटील- पवार (वय २५) असे दोघेही बसले होते. त्यांच्याशी सहज बोलणे होऊन कुंझरकरांनी मला धुळे येथे जायचे आहे. मी तुमच्या दुचाकीत पेट्रोल टाकतो मला घेऊन चला, असे त्यांनी सांगितल्यावर दोघेही तयार झाले. मात्र, दोघे दारूच्या नशेत असल्याने कुंझरकरांनी त्यांना संस्काराचे डोस पाजण्यास सुरवात केल्यावर खटके उडाले. वाद होऊन शिवीगाळ झाल्यावर कुंझरकर निघून गेले. 

पुन्हा वाद, हाणामारी... 
कुंझरकर पायीच बसस्थानकाकडे निघाल्यानंतर पवार कॉम्प्लेक्सजवळील पाण्याच्या एटीएमवर उभे होते. वाल्मीक देवरे व आबा पवार असे दोघेही दुचाकीने पाणी घेण्यासाठी थांबले. सहज त्यांची नजर कुंझरकरांवर गेल्यानंतर त्यांनी पुन्हा वाद घालून बेदम मारहाण केली. 

बेशुद्ध होईपर्यंत मारहाण 
पवार कॉम्प्लेक्सजवळ मारहाणीनंतर लाल रंगाच्या प्लॅटिना दुचाकीवर कुंझरकरांना बसवून ते शेतकी शाळेच्या दिशेने निघून गेले. त्यानंतर पळासदळ शिवारात तिघांमध्ये पुन्हा वाद होऊन मारहाणीत कुंझरकर खाली पडले. डोक्यावर मार लागून बेशुद्ध झाल्यानंतर दोघांनी पळ काढला. 
 
सीसीटीव्हीच दुवा 
मारेकऱ्यांनी मोबाईल व पैसे लंपास केले. गुन्ह्यात कुठलाही प्रत्यक्षदर्शी नव्हता. निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या तांत्रिक पथकातील नरेंद्र वारुळे, विजय पाटील, जयंत चौधरी, प्रदीप पाटील, दिनेश बडगुजर यांनी उपग्रहाच्या मदतीने कुंझरकरांचे घर आणि घटनास्थळ असे चार सेक्टरमध्ये विभागले. त्यात मारहाणीचे घटनास्थळ वेगळेच सापडल्यावर जवळपास पन्नास ठिकाणाहून सीसीटीव्ही फुटेज संकलित करून तपासल्यावर कुंझरकरांना मारहाणीची घटना सापडली. प्रत्यक्षदर्शीही आढळून आले. मात्र, मारेकरी ओळखू येत नसल्याने चित्रकार योगेश सुतार यांची मदत घेतली गेली. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image