बीएचआर घोटाळा : दोन हजार चारशे पानांचे दोषारोपपत्र दाखल

bhr patsanstha
bhr patsanstha

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, जळगाव या संस्थेत संस्थापकांच्या गैरव्यवहारानंतर अवसायक नियुक्त झाल्यावर पुणे आर्थिक गुन्हे शाखेने घोटाळा उघडकीस आणला होता. रंजना घोरपडे यांच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात तपासातून तब्बल ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १६३ रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे न्यायालयात सादर दोन हजार ४०० पानांच्या दोषारोपपत्रात नमूद आहे. 
रंजना घोरपडे यांच्या तक्रारीवरून डेक्कन (पुणे शहर) पोलिस ठाण्यात २४ नोव्हेंबर २०२० ला दाखल गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाधिकारी भाग्यश्री नवटके आणि त्यांच्या तपासपथकाने जळगाव शहरात ठाण मांडत अटकेतील सुजित बाविस्कर ऊर्फ वाणी, धरम सांखला, महावीर जैन, विवेक ठाकरे, कमलाकर कोळी अशा पाच संशयितांना अटक केली होती. तपास पूर्ण करत त्यांच्याविरुद्ध पुणे विशेष न्यायालयात दोन हजार ४०० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यात नमूद केल्याप्रमाणे रंजना घोरपडे व त्यांच्या बहिणीने गुंतविलेल्या १६ लाख ९० हजार १४२ रुपयांचा, तसेच पतसंस्थेच्या घोले रोड, पुणे, पिंळेगुरव, आंबेगाव, निगडी व जामनेर येथील मालमत्ता कमी किमतीत विकून त्यामध्ये ४८ कोटी ५६ लाख २५ हजार ८२० रुपयांचा अपहार, तसेच इतर १३ कोटी १७ लाख ७२ हजार २०१ रुपयांचा संशयास्पद व्यवहार असा एकूण ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १६३ रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे न्यायालयात सादर दोन हजार ४०० पानांच्या दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. फरारी अवसायक जितेंद्र कंडारे, सुनील झवर आणि इतरांविरुद्ध तपास सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

गर्दी गोळा करून ठकबाजी 
पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोपपत्रात नमूद केल्याप्रमाणे, अवसायक जितेंद्र कंडारे, सुनील झवर या फरारी संशयितांसह अटकेतील सुजित बाविस्कर ऊर्फ वाणी, धरम सांखला, महावीर जैन, विवेक ठाकरे, कमलाकर कोळी यांनी संस्था अवसायनात गेल्याची संधी साधत अधिकारांचा गैरवापर करून संस्थेच्या ठेवीदार, गुंतवणूकदारांना त्यांच्या रकमा परत देण्याचे आमिष दाखवत गर्दी गोळा केली. ठेवीदारांकडून ठेवींच्या मूळ पावत्या गोळा करून घेत त्याच्या बदल्यात ठेवीदारांना ठेवींचा पूर्ण मोबदला न देता, बेकादेशीरपणे कर्जधारकांची कर्जे निरंक करण्यासाठी वापरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

२० टक्के देऊन १०० टक्क्यांचे कागद 
अवसायक जितेंद्र कंडारेसह त्यांच्या साथीदार आरोपींनी बी.एच.आर पतसंस्थेच्या मालमत्तांची बाजारभावापेक्षा कमी दरात विक्री करवून घेतली व लिलावप्रक्रिया सदोष असल्याचे भासविले आहे. संस्था अवसायनात गेल्यानंतर ठेवीदार, गुंतवणूकदारांना समसमान तत्त्वाने त्यांच्या ठेवींची रक्कम वाटप होणे आवश्यक असताना संशयितांनी पूर्वनियोजित कटकारस्थान रचून ठेवीदारांना २० ते ३५ टक्केच परतावा दिला आणि त्यांच्याकडून १०० टक्के रक्कम मिळाल्याचे खोटे दस्तऐवज तयार करून घेतले. 

बोगस सॉफ्टवेअर केले लॉन्च 
बीएचआर पतसंस्थेच्या मालकीच्या मिळकती, मालमत्तांचे लिलाव करण्यासाठी अधिकृत सॉफ्टवेअरमध्ये फेरबदल करण्यात आले असून, त्याचे क्लोनिंग असलेले बनावट सॉफ्टवेअर गुजरातमधून तयार करवून घेतले होते. त्याच्याद्वारे संशयिताकडून ठकबाजीची दुकानदारी चालविली होती. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com