चालकाचे केले अपहरण मग खून करून विल्हेवाट 

रईस शेख
Tuesday, 12 January 2021

पोलिसांच्या तपासाअंती चालकाचा खून करून मारेकऱ्यांनी ट्रक पळवला होता. भोपाळ येथून पळवून आणत या ट्रकची भंगारात विल्हेवाट लावण्यात आली होती.

जळगाव : उभा ट्रक तासाभरात भंगारात तोडून त्यांची विल्हेवाट लावण्यात निष्णांत असलेला जळगावातील भंगार व्यावसायिक यासीन खान मुल्तानी याला भोपाळ (मध्य प्रदेश) पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. भोपाळ येथून चालकासह ट्रकचे अपहरण करून आणत चालकाचा खून करून फेकून देण्यात आले होते. २०१६ मध्ये कटकारस्थान रचून अपहरण, खून करून पुरावे नष्ट करत ट्रकची चोरी व त्याच्या विल्हेवाट प्रकरणात निशांतपुरा (भोपाळ) पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तेव्हापासून फरारी असलेला मुख्य संशयित यासीनच्या भोपाळ पोलिसांनी जळगावातून मुसक्या आवळल्या आहेत. 
भोपाळच्या निशांतपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वर्ष-२०१६ मध्ये ट्रकसह चालक बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. पोलिसांच्या तपासाअंती चालकाचा खून करून मारेकऱ्यांनी ट्रक पळवला होता. भोपाळ येथून पळवून आणत या ट्रकची भंगारात विल्हेवाट लावण्यात आली होती. निशांतपूर पोलिस ठाण्यात कलम-३७९, ३६४, ३०२, २०२, १२० (ब) अंतर्गत गुन्ह्याची नोंद होऊन ट्रकचालकाच्या मारेकऱ्यांसह संशयितांचा शोध सुरू होता. 

असा घेतला आरोपीचा शोध
पोलिसांनी एका संशयिताला अटक केल्यानंतर त्याने ट्रकचोरी व चालकाच्या खुनाचा उलगडा केल्यानंतर जळगाव शहरातील ऑटोनगरात भंगार व्यावसायिक यासीन खान मासूम खान मुल्तानी (वय ५२, रा. गणेशपुरी, मेहरूण) याच्यासह गुन्ह्यात सहभागी इतरांची नावे सांगितली होती. अनेक वेळेस भोपाळ पोलिस जळगावात येऊन धडकले. मात्र, पोलिस आल्याची अगाऊ माहिती यासीनला मिळत असल्याने तो पळून जायचा. मात्र, काही दिवसांपूर्वी भोपाळच्या पोलिसांनी जळगावात बस्तान मांडत जळगावच्या खबऱ्याच्या माध्यमातून यासीनचा शोध लावला. त्याला नुकतेच अटक करून भोपाळ नेण्यात आले असून, त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 

मोस्ट वॉन्टेड..
यासीनने महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, औरंगाबाद, जालना, मुंबई, ठाणे या जिल्ह्यांसह गुजरात, मध्य प्रदेशात प्रस्थ निर्माण केले असून, त्याच्यावर शंभराच्या वर ट्रकचोरीसह इतर गुन्हे दाखल आहेत. जिल्‍हा पोलिस दलाने त्याला हद्दपार केले होते. हद्दपारीत राजरोसपणे हिंडणाऱ्या यासीन मुल्तानीला एमआयडीसी पोलिसांनी अटक करून कारागृहात टाकले होते. तेथून काही महिन्यांपूर्वीच जामिनावर मुक्त झाल्यावर भोपाळ पोलिसांनी त्याला अटक केली. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news crime news truck driver kidnaping and murder