esakal | बंदुकीचा धाक दाखवून पंधरा लाख लुटणारे गवसले; नऊ लाखांची रोकड हस्तगत
sakal

बोलून बातमी शोधा

robbery case

विनानंबरच्या दुचाकीने ओव्हरटेक केला. रोकडची पिशवी लांबवताना झटापटीत भावसार यांची दुचाकी घसरल्याने तेही पडले. दोन्ही चोरट्यांची गाडी घसरली. यातील एकाने भावसार यांच्याकडून रोकड असणारी बॅग लांबविण्याचा प्रयत्न केला.

बंदुकीचा धाक दाखवून पंधरा लाख लुटणारे गवसले; नऊ लाखांची रोकड हस्तगत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : येथील पांडे चौक ते इच्छादेवी चौफुलीदरम्यान पिस्तुलाचा धाक दाखवून १५ लाखांची लूट केल्याप्रकरणी मोहाडी (जि. धुळे) येथील दोन संशयितांना उल्हासनगर (मुंबई) येथून पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्यांच्याकडून नऊ लाखांची रोकड, पिस्तूल जप्त केले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
डॉ. मुंडे म्हणाले, की १ मार्चला पांडे चौक ते इच्छादेवी चौफुलीदरम्यान प्रभा पॉलिमर कंपनीचे कर्मचारी महेश भावसार (रा. दिक्षीतवाडी) व संजय विभांडीक (महाबळ कॉलनी) सायंकाळी पाचला १५ लाखांची रोकड घेऊन गणपतीनगरकडे दुचाकीने निघाले. भावसार यांच्याकडे रोकड कापडाच्या पिशवीत होती. विभांडिक दुसऱ्या दुचाकीवर होते. दोन्ही पद्मावती मंगल कार्यालयाजवळ आले असताना संशयितांनी विनानंबरच्या दुचाकीने ओव्हरटेक केला. रोकडची पिशवी लांबवताना झटापटीत भावसार यांची दुचाकी घसरल्याने तेही पडले. दोन्ही चोरट्यांची गाडी घसरली. यातील एकाने भावसार यांच्याकडून रोकड असणारी बॅग लांबविण्याचा प्रयत्न केला. नंतर पिस्तूल काढून त्यांना धमकावत १५ लाखांची रोकड असलेली बॅग लांबविली. यावेळी नागरिकांनी सतर्कता दाखवत आरडाओरड केली. यामुळे संशयितांच्या पिस्तूलमधून मॅग्झिन खाली पडली. संशयित रोकड हिसकावून त्यांची मोटारसायकल टाकून पसार झाले होते. मोटारसायकलीच्या चेसीस क्रमांकावरून संशयिताची ओळख पटली. मनोज मोकळ व विकी ऊर्फ रितीक राणा (दोन्ही रा. मोहाडी, ता. जि. धुळे) अशी संशयितांची नावे आहेत. घटनेनुसार एमआयडीसी, एलसीबीच्या पथकाने तपासचक्र फिरविले. 

धुळे, सुरत नंतर उल्‍हासनगराचा प्रवास
घटनेनंतर संशयित दोघे धुळ्याला गेले. तेथून ते सुरत व नंतर उल्हासनगरला पळून गेले होते. दोघांना पोलिसांनी गुरुवारी रात्री ताब्यात घेऊन नऊ लाख दहा हजार रुपये जप्त केले. एमआयडीसीचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हेमंत कळसकर, सुधीर साळवे, इमरान सय्यद, स्थानिक गुन्हे शाखेचे स्वप्नील नाईक, संजय हिवरकर, राजेश मेंढे, रवी नरवाडे यांच्या पथकाने दोघांना अटक केली. संशयित मनोज मोकळ सराईत दरोडेखार असून, त्याच्यावर नाशिक येथे पाच दरोड्याचे गुन्हे आहेत. उर्वरित रक्कम व इतर बाबींचा तपास सुरू आहे. 
 

loading image