राज्‍यातील सहामध्ये जळगावचे शासकिय रूग्‍णालय; फुले जनआरोग्य योजनेतील कामाचा होणार सन्मान

देवीदास वाणी
Sunday, 24 January 2021

उत्कृष्ट कार्य झाल्याबद्दल राज्य शासनाने सर्वोत्तम सहा शासकीय रुग्णालयांचा सन्मान करण्याचे जाहीर केले आहे. त्यात जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा देखील समावेश

जळगाव : गरीब व गरजू रुग्णांना वेळेत आणि मोफत उपचार मिळावेत याकरिता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरु झालेली आहे. या योजनेतून उत्कृष्ट कार्य झाल्याबद्दल राज्य शासनाने सर्वोत्तम सहा शासकीय रुग्णालयांचा सन्मान करण्याचे जाहीर केले आहे. त्यात जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा देखील समावेश असून जिल्ह्याच्या शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात (ता.२६) रुग्णालयाचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला जाणार आहे. 

राज्‍यातील सहा रूग्‍णालयांमध्ये समावेश
राज्य सरकार राज्यातील सहा शासकीय रुग्णालयांचा सन्मान करीत आहे. यात जळगाव, अकोला, कोल्हापूर, लातूर, धुळे, मुंबई या शासकीय रुग्णालयांचा समावेश आहे. या योजनेमधून आतापर्यंत ५२ कोरोना विरहित तर कोरोनाच्या ५० रुग्णांनी योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये किडनी विकार, अपघाताचे रुग्ण, गर्भवती महिला, क्षयरोग, जनरल सर्जरी, हर्निया, हृदयरोग, विषबाधा, लहान मुलांचे आजार, डायलिसिस आदी आजाराने ग्रस्त रुग्णांना देखील लाभ झाला आहे. 

राज्य शासन करणार असलेल्या सन्मानामुळे योजनेत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या रुग्णालयातील सर्व घटकांना आणखी उत्तम कार्य मिळण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.ज्या रुग्णांना उपचार करण्यासाठी आर्थिक अडचण आहे, त्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून रुग्णालयातील उत्तम आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा. 
डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news goverment hospital and medical collage phule janaarogya yojna