esakal | मोहाडी रुग्णालयाची क्षमता महिनाभरात ८०० बेडवर
sakal

बोलून बातमी शोधा

covid hospital

मोहाडी रुग्णालयाची क्षमता महिनाभरात ८०० बेडवर

sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : कोरोनाबाधितांना दाखल करण्यात येणाऱ्या अडचणी, बेडची उपलब्धता यासाठी मोहाडी येथे सुरू करण्यात आलेल्या रुग्णालयाची क्षमता वाढविण्यात येणार आहे. जूनअखेरपर्यंत या रुग्णालयात ८०० बेड सज्ज असतील, त्यांपैकी ५०० कोविडसाठी व ३०० नॉन कोविडसाठी असतील, त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे. तिसऱ्या लाटेसाठी पुरेसे ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेडच्या उपलब्धतेसाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशासनाने प्रयत्न सूरू केले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

जिल्ह्यात सध्या दहा हजारांवर सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील एक हजारावर रुग्ण शासकीय रुग्णालयात आहेत. असे असले तरी ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरची कमतरता आहे. यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मोहाडी येथील महिला रुग्णालयात ८०० बेड तयार करण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्यात पाचशे बेड ऑक्सिजनयुक्त असतील. सध्या १०० बेड ऑक्सिजनयुक्त, तर २०० बेड सीसीसी सेंटरमध्ये आहेत.

चारशे बेडसाठी ऑक्‍सिजन पाइपलाइन

‘जीएमसी’ शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन बेड खाली नसेल तर मोहाडी येथील रुग्णालयात रुग्ण पाठविले जातात. इतर ४०० बेडसाठी ऑक्सिजन पाइपलाइन टाकण्याचे काम मोहाडी रुग्णालयात सुरू आहे. आगामी महिनाभरात ते काम पूर्ण होईल असा अंदाज आहे.

टप्प्याने सिव्हिल शिफ्ट करणार

सध्या संचारबंदी व निर्बंधांमुळे कोविडच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. आगामी काळात अशीच घट यापुढील काळात सुरू राहील असा अंदाज आरोग्य विभागाचा आहे. ‘जीएमसी’मध्ये सध्या केवळ कोरोनाबाधित रुग्ण दाखल होत आहेत. येथील संख्या कमी झाली, की कोरोनाबाधित ‘जीएमसी’तील सर्व रुग्ण मोहाडी रुग्णालयात हलविले जाणार आहेत. सध्या गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात सिव्हिल रुग्णालयाची सुविधा मिळत आहे, ती टप्प्याटप्प्याने पुन्हा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येईल. कोरोनाबाधितांसाठी मोहाडी रुग्णालय उपलब्ध असेल.

loading image