जळगावात पेट्रोलचे दर पाहिलेत का?; शतकाला अवघा दीड रूपया बाकी 

राजेश सोनवणे
Tuesday, 23 February 2021

अनलॉकनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सतत वाढत राहिल्‍या. मध्यंतरी काहीसे दर खाली आले होते; परंतु जानेवारीपासून भडका वाढतच आहे. मागील महिनाभरात पेट्रोलचे दर सहा रूपयांनी वाढले आहेत.

जळगाव : पेट्रोल- डिझेलच्या दरात दिवसेंदिवस उडणारा भडका सुरूच आहे. दरवाढीच्या भडक्‍यात पेट्रोलच्या दर आता शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. सततची ही दरवाढ सामान्यांच्या खिशाला मोठी झळ पोचविणारी ठरत आहे. आजच्या घडीला पेट्रोलचे दर हे ९८.३८ रूपये प्रतिलिटर आहेत. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाची दरवाढ आणि भारतीय रुपयाची होणारी घसरण यामुळे इंधन दरवाढीचा फटका सातत्‍याने जाणवत आहे. केंद्र शासनाकडून दोन वर्षापुर्वी पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलविण्याचे धोरण अवलंबिले होते. ते आज देखील कायम असून, सततच्या बदलणाऱ्या दरांमुळे वाहनधानकांना यात फारसा बदल जाणवून येत नाही. परंतु, शहरातील पंपावर येणाऱ्या पेट्रोल टँकवर लागणाऱ्या करामुळे शहरातंर्गत येणाऱ्या पंपावरील पेट्रोलचे दर ९८ रूपयांच्यावर गेले आहेत. 

अनलॉकनंतर परिस्‍थिती गंभीर 
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाउन लागला होता. या काळात नागरीकांना फारसा पेट्रोल दरवाढीचा फारसा परिणाम झाला नाही. मात्र अनलॉकनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सतत वाढत राहिल्‍या. मध्यंतरी काहीसे दर खाली आले होते; परंतु जानेवारीपासून भडका वाढतच आहे. मागील महिनाभरात पेट्रोलचे दर सहा रूपयांनी वाढले आहेत. सातत्‍याने वाढणाऱ्या किंमती पाहिल्‍या तर फेब्रुवारीअखेरपर्यंत पेट्रोल १०० रुपये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

रिक्षाभाडेही वाढले 
सततच्या वाढणाऱ्या पेट्रोलच्या दरामुळे प्रवासाी वाहतुक करणाऱ्या रिक्षांचे भाडे देखील वाढले आहे. जळगाव शहरात कोठेही जायचे असल्‍यास एका प्रवाशाकडून साधारण १२ ते १५ रूपये भाडे घेतले जात होते. परंतु, पेट्रोलचे दर वाढत राहिल्‍याने रिक्षा चालकांनी देखील प्रवाशी भाड्यात वाढ करून प्रतिसिट २० रूपये आकारणी केली आहे. मुख्य म्‍हणजे जळगावात शहर बससेवेची सुविधा नसल्‍याने रिक्षा हा एकमेव पर्याय ठरतो. यामुळे रिक्षा चालकांची मनमानी आणि प्रवाशांची एक प्रकारे पिळवणूकच होत आहे. 

जळगावातील इंधनाचे दर 
पेट्रोल - ९८.३८ प्रतिलिटर 
डिझेल - ८८.१० प्रतिलिटर 

जळगाव जिल्‍ह्‍यातील दर 
शहर...….पेट्रोल…..डिझेल 

अमळनेर...९७.४४....८७.२० 
चाळीसगाव..९८...….८८ 
पारोळा…...९७.२७...८७.०४ 
भुसावळ….९८.२८...८८.०३ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news petrol and diesel rate step by step up