व्यापारी जोमात, शेतकरी कोमात; जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांचा मका पडून

दिलीप वैद्य
Tuesday, 29 December 2020

केंद्र सरकारच्या भारतीय अन्न महामंडळाच्या अंतर्गत विविध राज्यांमधून मका खरेदी करण्यात आला. त्यासाठी प्रत्येक राज्याला एक विशिष्ट उद्दिष्ट खरेदीसाठी निश्चित करून देण्यात आले. राज्य सरकारच्या आदिवासी विकास महामंडळ आणि पणन महासंघाच्या वतीने ही खरेदी १७ नोव्हेंबरला सुरू करण्यात आली.

रावेर (जळगाव) : जळगाव जिल्ह्यातील सहा हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांचा सुमारे सव्वादोन लाख क्विंटल मका केंद्र शासनाने खरेदी थांबविल्यामुळे त्यांच्या घरात पडून आहे. खासदार रक्षा खडसे यांनी आता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून हा मका खरेदी करण्यासाठीचे उद्दिष्ट वाढवून घ्यावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. 
केंद्र सरकारच्या भारतीय अन्न महामंडळाच्या अंतर्गत विविध राज्यांमधून मका खरेदी करण्यात आला. त्यासाठी प्रत्येक राज्याला एक विशिष्ट उद्दिष्ट खरेदीसाठी निश्चित करून देण्यात आले. राज्य सरकारच्या आदिवासी विकास महामंडळ आणि पणन महासंघाच्या वतीने ही खरेदी १७ नोव्हेंबरला सुरू करण्यात आली. केंद्र शासनाने ठरवून दिलेले खरेदीचे उद्दिष्ट अवघ्या महिनाभरातच पूर्ण झाले म्हणून १६ डिसेंबरला खरेदीचे पोर्टल बंद करण्यात आले म्हणजेच खरेदी बंद करण्यात आली. 
दरम्यान, जिल्ह्यासह राज्यातील हजारो मका उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात मका पडून असताना आणि या सर्व शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी शासनाकडे केलेली असताना खरेदी बंद करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील ७ हजार ६१० शेतकऱ्यांनी आपला मका विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी फक्त १ हजार २९४ शेतकऱ्यांचा ५२ हजार ६८० क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. याचा अर्थ एकट्या जळगाव जिल्ह्यातील ६ हजार ३१६ शेतकऱ्यांचा मका केंद्र शासनाने खरेदी केला नाही. असा सुमारे सव्वा दोन लाख क्विंटल मका आता खाजगी व्यापारी मातीमोल भावात खरेदी करणार आहेत. शासनातर्फे खरेदी करण्यात येणाऱ्या मक्याला १ हजार ८५० रुपये क्विंटलचा भाव देण्यात येत होता तर खासगी व्यापारी मात्र अवघा बाराशे ते तेराशे रुपये क्विंटलचा भाव शेतकऱ्यांना देत आहेत. यामुळे क्विंटलमागे किमान ५०० रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे होत आहे. 

रक्षा खडसेंकडून अपेक्षा 
केळी उत्पादकांच्या विमा प्रश्नावर जनजागृती करून मोर्चा काढणाऱ्या खासदार रक्षा खडसे यांनी आता शेतकऱ्यांच्या या प्रश्नी केंद्र सरकारकडून मका खरेदीसाठी उद्दिष्ट वाढवून घ्यावे आणि मका खरेदी पुन्हा सुरू करावी, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा मका उत्पादक व्यक्त करीत आहेत. 

माझा दोनशे क्विंटल मका घरात पडून असून, शासनाने शेतकऱ्यांची मका खरेदी बंद केली आहे. त्यामुळे माझ्यासह अनेक शेतकरी अडचणीत येणार आहेत. खासगी व्यापारी कमी किमतीत मका खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावे. 
- किसन महाजन, शेतकरी, खिर्डी खुर्द (ता. रावेर, जि. जळगाव) 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news raver farmer corn kharedi stop in market