esakal | ‘रेमडेसिव्हिर’चा काळा बाजार रोखल्यानेच विरोधकांचा जळफळाट !
sakal

बोलून बातमी शोधा

‘रेमडेसिव्हिर’चा काळा बाजार रोखल्यानेच विरोधकांचा जळफळाट !

‘रेमडेसिव्हिर’चा काळा बाजार रोखल्यानेच विरोधकांचा जळफळाट !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : माजी आमदारांनी आणलेल्या, कोणतीही परवानगी नसलेल्या, तसेच कोणते ड्रग्ज त्यात आहे ते माहीत नसलेल्या इंजेक्शनला जनहितासाठीच रोखण्याचा प्रयत्न मी केला आहे. कुणाला हे चुकीचे वाटत असेल आणि त्यामुळे माझ्या बदनामीचा प्रयत्न ते करीत असतील तर हरकत नाही. माझ्या जनतेसाठी एक लाख वेळा बदनाम होण्याची माझी तयारी आहे. भूमिपुत्र या नात्याने माझ्या भूमीत जे जे बोगस येईल, त्यास माझा कायम विरोध असेल, असा पलटवार अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

हेही वाचा: जळगावात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार करणारी टोळी पकडली

माजी आमदार शिरीष चौधरी यांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शनसंदर्भात आमदार अनिल पाटील यांच्यावर पत्रकार परिषदेत विविध आरोप करून हे इंजेक्शन न मिळण्यास आमदारच जबाबदार असल्याचा आरोप केल्याने आमदार पाटील यांनी दुसऱ्या दिवशी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन माजी आमदारांना लक्ष्य केले. या वेळी आमदार पाटील म्हणाले, की रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा उपलब्ध असताना राज्य शासन काहीच प्रयत्न करीत नाही, असा माजी आमदारांचा आरोप आहे; परंतु ज्या भाजप सत्तेत असलेल्या राज्यात हे इंजेक्शन विक्री करण्यास का परवानगी मिळत नाही, हा माझा प्रश्न आहे. ब्रॅन्डेड म्हणजे मान्यताप्राप्त कंपनीच्या इंजेक्शनचा तुटवडा आहे म्हणून कुठूनतरी कमी भावात इंजेक्शन मिळवायचे आणि त्यातील थोडेफार वाटून बाकी काळ्या बाजारात विकायचे, असाच त्यांचा प्रयत्न होता. भारतात फक्त सात कंपन्यांला रेमडेसिव्हिर विक्रीची परवानगी आहे. एफडीएच्या माध्यमातून ही परवानगी घ्यावी लागते. त्यानंतरच ही विक्री करता येते. एखाद्या कोणत्याही बाटलीवर रेमडेसिव्हिर लिहिले म्हणून आपण टोचून घ्यायचे, हे चुकीचे असून, प्रत्यक्षात त्या इंजेक्शनला कोणत्या देशात परवानगी आहे, तेदेखील तपासले पाहिजे. यात कोणते ड्रग्ज आहेत, ते पाहिले पाहिजे. त्याचे साइड इफेक्ट्स बघितले गेले पाहिजेत. खरेतर यासारख्या इंजेक्शनमुळेच आपल्याकडे मृत होण्याचे प्रमाण वाढले आहे. ब्रूक फार्मा कंपनीच्या एका व्हायलची किंमत पाचशे रुपयांपर्यंत असून, ती एक्स्पोर्टची किंमत आहे, पण यांनी तेच १५०० ते ३००० रुपयांना विकून टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार केला आहे.

यांच्याकडे फार्माचा परवाना होता तर यांनी या कंपनीस रेमडेसिव्हिर भारतात विकण्यासाठी एफडीएकडे परवानगी का मागितली नाही. शासनाने आता निर्यात बंद केली म्हणून त्यांचे दुकान लावायला, हे तयार झाले आहेत. त्या वेळी परवानगी घेतली असती तर असा काळा बाजार करण्याची वेळच यांच्यावर आली नसती. ज्या वेळी ड्रग्ज ॲथॉरिटी म्हणजेच एफडीए म्हणेल की हे ओरिजिनल रेमडेसिव्हिर आहे तेव्हाच मी याला रेमडेसिव्हिर म्हणेन मात्र तोपर्यंत याला लोकांच्या जिवाशी खेळण्यास माझा विरोधच राहील. खरे पाहता निर्यात बंद झाल्याने मोठा स्टॉक स्वस्तात घेऊन त्याचा काळा बाजार यांना करायचा होता. मी तक्रार केली, त्यामुळे यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. त्यामुळे हा जळफळाट होतोय.

हेही वाचा: पती-पत्नीचा गळा आवळून खून; दागिने पळवून केला दरोड्याचा बनाव

मी वारंवार कोविड सेंटरला जाऊन बेड, सुविधा, औषध उपलब्धता, ऑक्सिजन याचा वेळोवेळी आढावा घेतला असून, खासगी रुग्णालयाच्या नेहमी संपर्कात राहिलो आहे. एवढेच काय मागील वर्षी कोविड प्रादुर्भाव सुरू होताच पहिला कॅम्प घेणारा आमदार मी होतो, मला कायम कोरोना होण्याचे स्वप्न यांना जरी पडत असेल तरी जनतेच्या आशीर्वादाने माझे काही बिघडणार नाही, यांनी काळजी करू नये, असा टोला आमदारांनी लगावला.

वाटप झालेले इंजेक्शन तपासणार

यांनी एक नंबरचे उद्योग केल्यास नक्कीच खांद्याला खांदा लावून उभा राहीन. मात्र, अवैध धंद्यांचे कधीही समर्थन करणार नाही, असेही आमदार पाटील यांनी सांगितले. दरम्यान, वाटप झालेले इंजेक्शन आम्ही तपासायला पाठविणार आहोत. ते घातक निघाल्यास जे जे कुणी त्यात दोषी ठरतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडू, असा इशारा आमदार पाटील यांनी दिला.

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image