अमळनेरचा ऐतिहासिक दगडी दरवाजा अजून मजबूत होणार 

उमेश काटे
Tuesday, 27 October 2020

दगडी दरवाजासाठीचे दुरुस्ती व संवर्धनाच्या कामाचे आदेश ठेकेदार अमन कन्स्ट्रक्शन यांना एक कोटी १२ लाख ९९ हजार २७३ रुपये याप्रमाणे ठेका देण्यात आला आहे,

अमळनेर: ऐतिहासिक दगडी दरवाजाचा पूर्वेकडील बुरूज गेल्या वर्षी पावसाळ्यात कोसळला होता. सुरक्षा म्हणून तात्पुरती गोण्यांची व्यवस्था करण्यात आली होती. अवजड वाहतूक इतर रस्त्यावरून वळविण्यात आली होती. मात्र, कायमस्वरूपी डागडुजी होऊन वाहतुकीचा प्रश्न सोडवावा. यासाठी शासनाचे लक्ष वेधले होते. त्याचेच फलित म्हणून पालिकेच्या माध्यमातून दगडी दरवाजाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरवात झाली आहे. या कामामुळे आता वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून धुळे- चोपडा राज्यमार्ग रुंद होणार आहे. 

आवश्य वाचा- दोन वर्षाची बालीका तिसऱ्या मजल्यावरून पडली, दैव बलवत्तर म्हणून वाचली ! 

१५ जानेवारी १९७० च्या शासन निर्णयान्वये येथील वेस (दगडी दरवाजा) राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यात आले होते. कृषिभूषण साहेबराव पाटील मित्रमंडळाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी वेस दुरुस्तीबाबत पाठपुरावा केला. तत्कालीन सहाय्यक संचालक पुरातत्त्व विभागाने देखभाल व दुरुस्तीबाबत काही अटींवर परवानगी दिली होती. दरम्यान, बुरुजाच्या पूर्वेकडील भाग २४ जुलै २०१९ ला पावसामुळे क्षतिग्रस्त झाला होता. या सर्व गोष्टींचा विचार करता संबंधित वेस देखरेख व दुरुस्ती कामासाठी पालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी ७ जानेवारी २०२० ला विशेष सभा व ठराव मांडून तसा प्रस्ताव शासनाला पाठवत पाठपुरावा केलेला होता. त्यानुसार वेस (दगडी दरवाजा) संरक्षित स्मारकाच्या यादीतून वगळण्यात यावे, ही लोकप्रतिनिधींची मागणी मान्य करून सदर स्मारक पालिकेकडे हस्तांतरण करण्याचे १९ मार्च २०२० च्या पत्रात प्रस्तावित केले. 

स्मारक संगोपन योजनेंतर्गत येथील पालिकेला संगोपणार्थ दहा वर्षांसाठी शासनाच्या वतीने परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, दगडी दरवाजा कामाचे भूमिपूजन शनिवारी (ता. २४) आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, मुख्याधिकारी विद्या गायकवाड यांच्या हस्ते पार पडले. रविवारी रात्री ऐतिहासिक बुरूज पाडण्याचे काम जेसीबीच्या सहाय्याने सुरू होते. ३३ फूट जाळीचा बुरूज आता कमी होणार असल्याने हा रस्ता आता २० ते २३ फूट रुंद होणार आहे. त्यामुळे येथे एकाच वेळी दोन वाहने सहज जाणार आहेत. 

वाचा- भाजपचा व्हाट्सअप गृप झाला राष्ट्रवादीचा, मग काय भाजप कार्यकर्त्यांची झाली पंचाईत !

अमळनेरकरांची स्वप्नपूर्ती होणार 
दगडी दरवाजाच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा, यासाठी आमदार अनिल पाटील, तत्कालीन आमदार स्मिता वाघ यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता. पालिकेने शासन निर्णय २६ जून २०२० च्या अन्वये २२ ऑक्टोबरला दगडी दरवाजासाठीचे दुरुस्ती व संवर्धनाच्या कामाचे आदेश ठेकेदार अमन कन्स्ट्रक्शन यांना एक कोटी १२ लाख ९९ हजार २७३ रुपये याप्रमाणे ठेका देण्यात आला. पालिकेच्या तिजोरीवर सध्या जरी भार पडणार असला तरी आमदार अनिल पाटील यांनी या कामासाठी ५० लाखांपेक्षा जास्तीचा निधी शासनाकडून आणण्याचे आश्वासन दिले आहे.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner work begins on strengthening amalner's historic stone gate