भडगाव तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 June 2020

भडगाव तालुका कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे. आतापर्यंत ५९ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून उर्वरित रूग्णही लवकरच बरे होण्याची शक्यता आहे. मात्र, नागरिकांनी कुठेही गर्दी न करता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. 
- माधुरी आंधळे, तहसीलदार, भडगाव 

भडगाव : भडगाव तालुका कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे. काल (३ जून) पुन्हा नऊ बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ५९ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, अवघे १६ जण उपचार घेत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील व डॉ. पंकज जाधव यांनी सांगितले. रविवारपर्यंत इतर उपचार घेत असलेल्या रूग्णांनाही घरी सोडण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 
भडगाव तालुक्यात आतापर्यंत ७८ लोक कोरोनाग्रस्त म्हणून आढळून आले आहेत. यातील तिघांचा मृत्यू झाला असून, उर्वरित उपचार घेत असलेले रुग्ण झपाट्याने बरे होत आहेत. आतापर्यंत ७८ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे चाचणीतून निष्पन्न झाले. त्यात शहरातील ७५ तर निंभोरा येथील दोन व वडजीतील एकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यातील तब्बल ५९ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर तिघांचा मृत्यू झाला असून १६ जण उपचार घेत आहेत. त्यातील नऊ जण भडगावच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. शिवाय सात रुग्ण जळगाव येथे उपचार घेत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. उपचार घेत असलेल्या १६ रुग्णांना देखील रविवारपर्यंत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नवीन रुग्ण निष्पन्न झाले नाही तर सोमवारपर्यंत भडगाव तालुका कोरोनामुक्त होईल, अशी शक्यता आहे. 

दहा दिवसांनंतरही रिपोर्ट येईना 
भडगाव तालुक्यातील २९ लोकांचे तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. त्यातील १६ जणांचे स्वॅब घ्यायला १० दिवसांच्यावर झाले आहेत. मात्र, त्यांचे अहवाल जळगावहून आलेले नाहीत. तर दोघांचे अहवाल धुळे येथे पाठवून २० ते २२ दिवस होऊनही अद्याप आलेले नव्हते. त्यापैकी एकाचा अहवाल आज प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे १० दिवसांपेक्षा अधिक दिवस क्वारंटाइन असलेल्यांचा तपासणी अहवाल न आलेल्या १७ लोकांना घरी सोडण्यात आलेले आहे. मात्र, या सर्वांना १४ दिवस घरातच क्वारंटाइन राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. कजगाव येथील ११ जणांना मराठी शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते. या सर्वांचे अहवाल आज निगेटिव्ह आल्याचे डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले. 
 
बालकापासून वृद्धापर्यंत सर्व कोरोनामुक्त 
भडगाव तालुक्यात नऊ महिन्यांच्या बाळापासून ते ९४ वर्षांच्या वृद्धेला कोरोनाची लागण झाली होती. विशेष म्हणजे ९ महिन्यांचे बालक कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून ९४ वर्षांच्या वृद्धेवरही उपचार सुरू असून, रविवारपर्यंत त्या देखील बऱ्या होऊन घरी परतणार आहेत, अशी माहिती डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली. ग्रामीण भागातील तीन रुग्ण बरे झाले आहेत. सध्या उपचार घेत असलेले सर्व रुग्ण भडगाव शहरातील आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhadgaon taluka way to coronation