चोर आले...साडेदहा लाखाचा ऐवजही लुटला पण.

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

अनेक दिवसांपासून घराला कुलूप लागलेले होते. डॉक्‍टराचे ते घर चोरट्यांनी हेरले. घरात कोणीच नाही म्हणून थेट घरात घुसले. घरातील सर्व कपाट, कॉटमधील वस्तू फेकून रोकडसह दागिने घेतले. यात साधारण साडेदहा लाख रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. चोरी करून गेल्यानंतर मात्र त्यांना समजले की सदर घर असलेले डॉक्‍टर कोरोना पॉझिटीव्ह आहे. हे समजल्यावर चोरट्यांना देखील धक्‍काच बसला.

भुसावळ : शहरातील खडकारोड भागातील रजा नगरातील रहिवासी डॉक्टरास कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना जळगाव येथे उपचार सुरु आहेत. तर पत्नी आणि मुलगा क्वारंटाइन सेंटरला होते. त्यामुळे घरात कुणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी १० लाख ६० हजाराच्या रोख रक्कमेसह सोन्या, चांदीचे दागिणे लंपास केल्याची घटना घडली.

आवर्जून वाचा - आईच्या मृत्यूचे दुःख नाही...त्यांना हवेत मृतदेहावरील दागिने; भावांची मारामारी 

खडका रोड परिसरात दवाखाना असलेल्या ३५ वर्षीय डॉक्टरांस कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना २४ मे रोजी जळगाव येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांची पत्नी देखील डॉक्टर असून, पत्नी आणि मुलास जवाहर नवोदय विद्यालयातील क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. या दरम्यान घरात कुणीही नसल्याने पोलिसांनी घर सील केले होते. या संधीचा गैरफायदा घेत, चोरट्यांनी बेडरुमच्या खिडकीचे गज वाकवून कपाटातील १० लाख ९० हजाराची रोकड आणि ६० हजार ९०० रुपयांचे दागिणे लंपास केले. १ जूनला डॉक्टरांच्या पत्नी आणि मुलाचा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. घरी जाऊन पाहिले असता, बेडरुमच्या खिडकीचे गज तोडलेले, आणि कपाटातील सामान अस्ताव्यस्त केल्याचे निदर्शनास आले.

क्‍लिक करा - खाली सुरू होती वटपौर्णिमेची तयारी...तो वरती गेला अन्‌ आलाच नाही 
 

यानंतर त्यांनी कपाट तपासले असता, यातून दागिणे आणि रोकड लंपास झाल्याचे समजले. याबाबत डॉक्टरांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन बाजारपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे तपास करीत आहे. 

प्रशासनावर रोष
कोरोना बाधित डॉक्टरांच्या पत्नी आणि मुलास जवाहर नवोदय विद्यालयात क्वारंटाइन करण्यात आले होते. मात्र, आपण स्वत: डॉक्टर असल्याने आम्हाला घरातच होम क्वारंटाइन करण्याची मागणी डॉक्टरांच्या पत्नीने केली होती. यासंदर्भात त्यांनी प्रशासनास निवेदनही दिले होते. तरी देखील त्यांना नवोदय विद्यालयात क्वारंटाइन करण्यात आले. नेमकी हीच संधी साधत चोरीची घटना घडल्याने डॉक्टरांच्या पत्नीने प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal corona positive doctor house robary