
भुसावळ रेल्वे स्थानकावर अचानक विशेष तिकीट तपासणी मोहिम राबवल्याने फुकट्या प्रवाशांमध्ये खळबळ उडाली.
भुसावळ (जळगाव) : वाहतुकीची मोठी लाईन असलेल्या रेल्वेमधून अनेकजण विना तिकिट प्रवास करत असतात. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आरक्षण केल्याशिवाय रेल्वेत प्रवास करण्यास बंदी आहे. असे असताना देखील विना तिकिट प्रवास करणारे आढळून आले.
कोरोना काळात केवळ आरक्षित रेल्वे गाड्या सुरू असतानाही काही प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असल्याने रेल्वे वाणिज्य प्रशासनाने शुक्रवारी (ता. ११) भुसावळ रेल्वे स्थानकावर अचानक विशेष तिकीट तपासणी मोहिम राबवल्याने फुकट्या प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह अन्य रेल्वे नियमांचे उल्लंघण करणाऱ्या १३७ प्रवाशांवर कारवाई करीत तब्बल ७८ हजार ९० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
हेपण वाचा- जळगाव जिल्ह्यात १६ पर्यंत पाऊस; नंतर थंडीची लाट
रेल्वे ॲक्टनुसार खटले दाखल
भुसावळचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार व विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी. अरुणकुमार आणि साहाय्यक वाणिज्य प्रबंधक (टी. जा.) अनिल पाठक, विशेष तिकीट तपासणी निरीक्षक वाय. डी. पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत १३७ विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ७८ हजार ९० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. २१ तिकीट तपासणी कर्मचारी आणि १० आरपीएफ स्टाफ यांनी ही कारवाई केली. जे प्रवासी दंड भरण्यास असमर्थ ठरले त्यांच्यावर रेल्वे अॅक्टनुसार दोन खटले तर रेल्वे अॅक्ट १४४ नुसार तीन केसेस व रेल्वे अॅक्ट १४७ नुसार दोन केसेस करण्यात आल्या.
संपादन ः राजेश सोनवणे