मुलाचे लग्न झाल्याने घरात होते आनंदाचे वातावरण; आणि क्षणातच वडिलांच्या अपघाताची आली बातमी 

दिपक कच्छवा
Wednesday, 21 October 2020

मोटारसायकल दुरूस्तीसाठी मेहूणबारे येथे नेली.दुचाकीचे काम करीत असतांना एक स्पार्ट कमी पडल्याने विजय गायकवाड हे खाजगी वाहनाने चाळीसगावी आले व स्पेअर पार्ट घेऊन मेहूणबारे येथे आले.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव)  ः दुचाकीचे काम करून घरी जाणाऱ्या उसतोड कामगाराच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना चाळीसगाव-धुळे रस्त्यावर खडकीसीत ते दहिवद दरम्यान घडली. 10 दिवसापूर्वीच मुलाचे लग्न झाल्याने घरात आनंदाचे वातावरण होते.मात्र या आनंदावर काळाची दृष्ट नजर गेली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले.

आर्वजून वाचा- माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी फडणवीसांनी पोलिसांना केला फोन - खडसे
    

कुंझर (ता.चाळीसगाव) येथील विजय अमृत गायकवाड (45) हे पत्नी व तीन मुलांसह मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकत होते.गळीप हंगामाच्या काळात ते पाठीवर बिऱ्हाड टाकून उसतोडणीसाठी कुटुंबासह बारडोली येथे जाणार होते. आज (ता.२१) रोजी ते बारडोली येथे उसतोडणीसाठी रवाना होणार होते. त्यासाठी मंगळवारी दुपारी त्यांनी आपली मोटारसायकल दुरूस्तीसाठी मेहूणबारे येथे नेली.दुचाकीचे काम करीत असतांना एक स्पार्ट कमी पडल्याने विजय गायकवाड हे खाजगी वाहनाने चाळीसगावी आले व स्पेअर पार्ट घेऊन मेहूणबारे येथे आले. दुचाकी दुरूस्ती झाल्यानंतर दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास कुंझर येथे घराकडे जात असतांनाच खडकी ते दहिवद दरम्यान दत्तमंदिर जवळ त्यांच्या दुचाकीला (एमएच.19/3216) पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात गायकवाड हे फेकले गेल्याने त्यांना जबर मार लागला. त्यात त्यांचा मृत्यु झाला.अपघातानंतर अज्ञात वाहन घटनेची माहिती न देताच पळून गेले. याप्रकरणी विठ्ठल भिका सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून मेहूणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

आनंदाच्या क्षणाला काळाचा घाला

मृत विजय गायकवाड यांच्या मोठ्या मुलाचे 10 दिवसापूर्वीच लग्न झाले. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. लग्न आटोपल्याने आता हे कुटुंब उदरनिर्वाहच्या निमीत्ताने गुजरात बारडोली साखर कारखान्यात उस तोडणीस जाण्यासाठी तयारी करीत होते.गायकवाड कुटुंबिय गरीब आणि कष्टाळू होते. उसतोडणीसाठी बारडोलीकडे रवाना होण्यापूर्वीच काळाने अपघाताच्या रूपाने विजय गायकवाड यांचेवर झडप घातल्याने या दुखद घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon Accidental death of a sugarcane worker on a two-wheeler in an unidentified vehicle collision