सततच्या पावसामुळे शेतकऱयांच्या डोळ्यात आले पाणी !

दीपक कच्छवा
Wednesday, 23 September 2020

पावसामुळे कपाशी लाल पडून फुलपात्या व कैऱ्या काळ्या पडून सडून जात आहे. त्यामुळे कपाशीच्या उत्पन्नात यंदाही शेतकऱ्यांना मोठा मार खावा लागणार आहे.अद्याप परतीचा पाऊस गेला नाही.

 

मेहुणबारे (ता.चाळीसगाव)  : अति आणि सततच्या पावसामुळे चाळीसगाव तालुक्यात यंदाही दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे. पावसाच्या अति माऱ्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले असून असाच पाऊस सुरु राहीला तर हाती काहीच लागणार नाही अशी भिती शेतकऱ्यंाना सतावू लागली आहे. या पावसाचा  सर्वाधिक फटका पांढरे सोने असलेल्या कपाशीला बसू लागला आहे. कपाशीच्या कैऱ्या काळ्या पडून गळू लागल्या आहेत. त्यामुळे यंदाही कपाशीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट येण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

आवश्य वाचाः  जळगाव जिल्ह्यात शनिवारपासून पावसाचा ब्रेक 
 

चाळीसगाव तालुक्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे उडीद, मूग या पिकांना जबर फटका बसला.कपाशी, ज्वारी, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अति पावसामुळे सलग दुसऱ्या वर्षीही शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर निसर्गाने नांगर फिरविल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कृषी विभागाकडून केवळ तीनच गावांमध्ये केवळ 58 शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला असला तरी गावागावात नुकसानीचे भयावह चित्र समोर येत आहे.

गेल्या वर्षीही परतीच्या पावसाने दिवाळीपर्यंत हाहाकार माजवला होता. त्यामुळे गेल्या वर्षी ज्वारी, बाजरी, कापूस, मका या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.तीच परिस्थिती पुन्हा दुसऱ्या वर्षीही उदभवली असून गेल्या काही दिवसापासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसत आहे. पावसामुळे कपाशी लाल पडून फुलपात्या व कैऱ्या काळ्या पडून सडून जात आहे. त्यामुळे कपाशीच्या उत्पन्नात यंदाही शेतकऱ्यांना मोठा मार खावा लागणार आहे.अद्याप परतीचा पाऊस गेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यंाच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे.

आवर्जून वाचा - धोक्याची घंटा :  मुलांचा ‘स्क्रीन शेअरिंग’सात तासांपर्यंत 
 

गिरणा पट्ट्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याची कॉंग्रेसची मागणी
दरम्यान चाळीसगाव तालुक्यात गिरणा पट्ट्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे व गिरणा धरणातील पाणी विसर्गामुळे नदीला आलेल्या पुरामुळे गिरणा पट्ट्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.हे नुकसान लक्षात घेऊन तालु्नयात लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी तालुका कॉंगे्रसच्या वतीने उपविभागीय अधिकारी भाग चाळीसगाव यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष आबासाहेब निकम, शहराध्यक्ष देवेंद्र पाटील, रमेश शिंपी, रविंद्र जाधव, आर डी चौधरी, प्रदीप देशमुख, सिद्धार्थ सोनवणे, मंगेश अग्रवाल, आर जी पाटील, चंद्रमणी सुर्यवंशी यांच्या सह्या आहेत.
 

संपादन-  भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon Heavy rains caused severe damage to crops