चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टी, सात गावांचा तुटला संपर्क  

दीपक कच्छवा
Saturday, 26 September 2020

हातले व तळेगाव मंडळात अक्षरश: अतिवृष्टी झाली असून, तळेगाव मंडळात एकाच दिवसात ११५ मिलिमीटर, तर हातले मंडळात ८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव)  : चाळीसगाव तालुक्यात शुक्रवारी रात्री दहानंतर मुसळधार पाऊस झाला, तर हातले आणि तळेगाव मंडळात अतिवृष्टी झाली असून, पिके पूर्णत: पाण्याखाली गेली आहेत. अनेक शेतांमध्ये पाणी साचले आहे.

वाचा- अवैध वाळू उपसा थांबवा अन्यथा उपोषणाला बसू;संतप्त शेतकऱयांनी दिला इशारा !

अतिपावसामुळे तांबोळे येथील पुलाला चार फूट पाणी आले होते. त्यामुळे या भागातील सात गावांचा चाळीसगावशी संपर्क तुटला होता. सकाळी पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली. हिरापूर येथे रेल्वेपुलाखाली पाणी साचल्याने वाहतूक ठप्प होती. 
चाळीसगाव तालुक्यात १ जून ते २६ सप्टेंबरपर्यंत ६६० मिलिमीटर, तर सरासरी पावसाच्या तुलनेत तब्बल ९०५.८९ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. एकाच दिवसात सातही मंडळांत सुमारे ३७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यात हातले व तळेगाव मंडळात अक्षरश: अतिवृष्टी झाली असून, तळेगाव मंडळात एकाच दिवसात ११५ मिलिमीटर, तर हातले मंडळात ८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीसह सततच्या पावसामुळे उडीद, मूग या कडधान्यांना फटका बसला असतानाच ज्वारी, बाजरी व पांढरे सोने असलेल्या कपाशीला मार बसला आहे. 

 

तळेगाव, खडकी भागात अतिपावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले असून, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यात १८ सप्टेंबरलाही रांजणगाव, वाघळी, हिरापूर आदी भागांत पावसामुळे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान, अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात असून, शासनाने नुकसानग्रस्त भागातील पिकांचे सरसकट पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर जाधव यांनी केली आहे. 

धक्कादायक : चक्क चार महिन्यापासून ट्रामा सेंटरमध्ये १०‘व्हेटीलेटर’धुळखात
 

सात गावांचा तुटला संपर्क 
तांबोळेजवळील नदीला शुक्रवारी रात्री पूर आला. त्यामुळे तांबोळेसह चितेगाव, गणेशपूर, ओढरे, शिंदी, जुनपाणी, पिंप्री या सात गावांचा चाळीसगावशी संपर्क तुटला होता. शनिवारी (ता. २६) सकाळी या पुलावरील पाणी ओसरल्यावर खोळंबलेली वाहतूक सुरळीत सुरू झाली. तालुक्यात सात मंडळांत शनिवारी (ता. २६) सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार एकाच दिवसात ९०५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. 

सात मंडळांत झालेला पाऊस 
चाळीसगाव---- ५४ मिलिमीटर 
मेहुणबारे-------१२ मिलिमीटर 
शिरसगाव------४५ मिलिमीटर 
हातले---------८४ मिलिमीटर 
बहाळ---------०५.०० मिलिमीटर 
खडकी---------६३ मिलिमीटर 
तळेगाव---------११५ मिलिमीटर 
एकूण------------३७८ मिलिमीटर 
एका दिवसाची टक्केवारी- ५४.०० मिलिमीटर 
आतापर्यंतचा एकूण पाऊस- ९०५ मिलिमीटर  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon Many villages in chalisgaon taluka were cut off due to heavy rains