esakal | ब्राह्मणाचे मंगलाष्‍टकातील ‘सावधान’ अन्‌ ते होतात तयार
sakal

बोलून बातमी शोधा

marriage thief

तुलसी विवाहानंतर विवाहाचे मुहूर्त निघणे सुरू होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यासाठी किती जणांनी उपस्थिती द्यावी, याविषयी प्रशासनाने नियमावली तयार केली आहे. मात्र, हे सर्व नियम धाब्यावर बसवून विवाह सोहळ्यांना सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

ब्राह्मणाचे मंगलाष्‍टकातील ‘सावधान’ अन्‌ ते होतात तयार

sakal_logo
By
आनन शिंपी

चाळीसगाव (जळगाव) : मंगल कार्यालयांत होणाऱ्या विवाह सोहळ्यांत म्हटल्या जाणाऱ्या मंगलाष्टकामधील ‘सावधान’ या शब्दाचा अर्थ वऱ्हाडींना आता वेगळा घ्यावा लागणार आहे. कारण मंगल कार्यालयांमध्ये होणाऱ्या चोरांपासूनही वऱ्हाडींनी सावधान राहावे, असा संदेश देण्याची वेळ वाढत्या चोऱ्यांमुळे सध्या आली आहे. अशा सोहळ्यांमध्ये सर्रास चोऱ्या होत असताना लाखो रुपये आकारणाऱ्या मंगल कार्यालयांकडून मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे वास्तवही समोर आले आहे.

हेपण वाचा- जळगाव जिल्‍ह्‍यात १६ पर्यंत पाऊस; नंतर थंडीची लाट

 
तुलसी विवाहानंतर विवाहाचे मुहूर्त निघणे सुरू होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यासाठी किती जणांनी उपस्थिती द्यावी, याविषयी प्रशासनाने नियमावली तयार केली आहे. मात्र, हे सर्व नियम धाब्यावर बसवून विवाह सोहळ्यांना सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. याच गर्दीचा फायदा सध्या चोरटे घेत असून, विवाह सोहळ्यांत छोट्या-मोठ्या चोऱ्या होण्याचे प्रकार वाढले आहेत. 

नक्‍की वाचा- उत्तर महाराष्ट्रात भाजपला बसणार आणखी मोठा झटका ? वाढदिवसाच्या जाहिरातीतून दिले नेत्याने संकेत

कॉन्ट्रॅक्ट पद्धतीकडे कल 
अलीकडे बहुतांश वर किंवा वधू पित्यांचा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने विवाह करण्याकडे कल असतो. विवाह करणाऱ्यांची गरज ओळखून मंगल कार्यालयांत आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून लाखो रुपये, अशा सगळ्यांसाठी आकारले जातात. छोटी-मोठी चोरी झाल्यानंतर आपल्या ऐवजाची आपणच काळजी घेतली पाहिजे, असे सांगून मंगल कार्यालयाचे व्यवस्थापन हात वर करतात. 

सुरक्षिततेकडे दुर्लक्ष 
विवाह सोहळ्यांत आपल्या मंगल कार्यालयात येणाऱ्या वऱ्हाडींना जास्तीत जास्त सोयी-सुविधा पुरविण्याची जबाबदारी मंगल कार्यालयांची असते, तेवढीच जबाबदारी त्यांच्या सुरक्षिततेचीही असते. प्रत्यक्षात अशी सुरक्षितता बहुतांश मंगल कार्यालयांमध्ये दिसून येत नाही. काही ठिकाणी तर सीसीटीव्ही कॅमेरे केवळ नावालाच लावलेले आहेत. त्याचा फायदा चोरटे घेत असून, छोट्या-मोठ्या चोऱ्या होण्याचे प्रकार वाढले आहेत. 

सोन्याचा ऐवज चोरी 
येथील धुळे बायपास रोडवरील विराम गार्डन मंगल कार्यालयात ६ ते ८ डिसेंबरदरम्यान चोरट्यांनी चांगलाच हात साफ केला. एका प्रतिष्ठित कुटुंबीयाच्या हळदीच्या कार्यक्रमात तीन पर्स चोरीस गेल्या. यापूर्वी शहरातील नारायणवाडी भागात झालेल्या विवाहात महिलेची सोन्याची पोत लंपास झाली होती. याशिवाय इतर काही मंगल कार्यालयांमध्येही किरकोळ चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ज्यांचा ऐवज चोरीला जातो, त्यांची तक्रार बऱ्याचदा पोलिस घेत नाहीत. तक्रार घेतली, तर तक्रारदाराला तासन् तास पोलिस ठाण्यात बसून राहावे लागते. 

संशय घ्यावा तरी कोणावर? 
विवाह सोहळ्यांत एकमेकांचे नातेवाईक व ओळखीचे उपस्थित असतात. याशिवाय मंगल कार्यालयाचे कर्मचारी, स्वयंपाक करणारे व त्यांचे कामगार आदी उपस्थित असतात. अशा वेळी नेमका संशय कोणावर घ्यावा? असा प्रश्न तक्रारदाराला पडतो. वास्तविक, लाखो रुपये घेणाऱ्या मंगल कार्यालयांच्या मालकांची आपल्या कार्यालयात येणाऱ्यांची सुरक्षितता जोपासण्याची जबाबदारी आहे. 

शहर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सर्व मंगल कार्यालय चालकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही योग्य त्या उपाययोजना करण्याची सूचना अगोदरच केली आहे. दोन दिवसांत लवकरच सर्व मंगल कार्यालय मालकांची बैठक घेऊन त्यांना आणखी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात सांगू. 
- विजयकुमार ठाकूरवार, पोलिस निरीक्षक, चाळीसगाव 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image