पती-पत्नी घराबाहेर पडले आणि दोन लाखाचे दागिणे गमावून बसले !

दिपक कच्छवा
Saturday, 24 October 2020

चाळीसगावात गेल्या काही दिवसापासून शहरात दुचाकी, चारचाकी वाहनांच्या चोरीसह घरफोड्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. दहा दिवसापूर्वीच शास्त्रीनगर भागातून घरासमोर लावलेली स्विफ्ट कार चोरीस गेल्याचा प्रकार घडला होता.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव): पती मोबाईल दुरूस्तीसाठी तर पत्नी भाजीपाला घेण्यासाठी घराबाहेर पडले आणि हीच संधी साधून चोरट्याने घराचे कुलूप तोडून सुमारे पावणे दोन लाख रूपये किंमतीचे दागिने लंपास केले.भर दिवसा शहरातील गजबजलेल्या अभिनव शाळेच्या मागे, शास्त्रीनगरमध्ये हा प्रकार घडला. सेवा निवृत्त नायब तहसीलदार यांच्या घरी झालेल्या या धाडसी आणि खळबजनक चोरीच्या प्रकाराने परिसरात एकच भितीचे वातावरण पसरले आहे.

दिलासादायक : ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या अमळनेरात रुग्ण नसल्याने कोविड सेंटर बंद  !

या घटनेची माहिती अशी की, सेवानिवृत्त नायब तहसीलदार राजेंद्रसिंग शामसिंग कुर्हकर (58) हे पत्नीसह शहरातील अभिनव शाळेच्या पाठीमागे शास्त्रीनगरमध्ये राहतात. मुलगा पुण्याला नोकरीनिमीत्त राहत असल्याने कुर्हकर दाम्पत्य चाळीसगावी राहत होते. आज शनिवार दि.24 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास राजेंद्रसिंग कुर्हकर हे मोबाईल दुरुस्तीसाठी शहरात गेले तर त्यांच्या पत्नी मीनाक्षी कुर्हकर ह्या देखील भाजीपाला घेण्यासाठी घराला कुलूप लावून बाहेर पडल्या.राजेंद्रसिंग कुर्हकर हे मोबाईल दुरूस्ती करून दुपारी 12.30 वाजता घरी आले असता त्यांना घराच्या दरवाजाला कुलूप नव्हते, फ्नत कडी लावलेली दिसून आली.पत्नी आपल्यापूवीच घरी आली असावी व शेजारी कुठेतरी गेली असावी म्हणून कुर्हकर हे घरात बेडरूमध्ये कपडे बदलण्यासाठी गेले असता बेडरूमधील फर्निचर केलेले लाकडी कपाट उघडे होते व कपाटातील सामान बेडवर पडलेले दिसून आले.पत्नी घरी आल्यानंतर कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रकमेची पाहणी केली असता ते गायब झाल्याचे दिसून आले. 

 

त्यात 40 हजार रूपये किंमतीच्या प्रत्येकी 8 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन चैन,35 हजार रूपये किंमतीचे प्रत्येकी 7 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 12 हजार 500 रूपये किंमतीची 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कर्णफुल, 7 हजार 500 रूपये किंमतीचे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले, 55 हजार रूपये किंमतीची 22 ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत, 12 हजार 500 रूपये किंमतीच्या प्रत्येकी एक ग्रॅम याप्रमाणे पाच सोन्याच्या अंगठ्या, 16 हजार रूपये किंमतीचे 200 ग्रॅम वजनाचे 20चांदीचे जोडवे, 4 हजार रूपये किंमतीचे 50 ग्रॅम वजनाची चांदीची समई व 3 हजार 500 रूपयांची रोकड असा सुमारे 1 लाख 86 हजार रूपयांचा ऐवज कोणीतरी अज्ञात इसमाने घराचे दरवाजाचे कुलूप तोडून बेडरूमधील असलेल्या फर्निचर केलेल्या लाकडी कपाटातून चोरून नेला.याप्रकरणी राजेंद्रसिंग कुर्हकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा- अडीच हेक्टर जागेवरील अतिक्रमण हटवीले, ते ही शांततेत ! 

दिवसाढवळ्या चोरी
दरम्यान गेल्या काही दिवसापासून शहरात दुचाकी, चारचाकी वाहनांच्या चोरीसह घरफोड्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. दहा दिवसापूर्वीच शास्त्रीनगर भागातून घरासमोर लावलेली स्विफ्ट कार चोरीस गेल्याचा प्रकार घडला होता. आज दिवसाढवळ्या घराला कुलूप असल्याची संधी साधत चोरट्याने दोन लाखाचा ऐवज चोरून नेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon Thieves broke into the house of a retired tehsildar and stole jewelery worth two lakh