‘गिरणा’त ४२ टक्के जलसाठा; तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girna Dam

‘गिरणा’त ४२ टक्के जलसाठा; तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम

चाळीसगाव ः शहरासह तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा (Rain)जोर कायम असल्याने अनेक शेतांमध्ये पाणी साचले आहे. तीन दिवसांपासून सूर्यदर्शनच झालेले नाही. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी (Farmers Happy) समाधानकारक ठरला आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे तालुक्याला वरदान ठरलेल्या मन्याड धरणात (Manyad Dam) वाढ झाली असून मन्याडचा साठा २७ टक्क्यांवरुन ४५ टक्क्यांवर पोचला आहे. तर गिरणा धरणातही काही अंशी वाढ झाली असून सद्यःस्थितीत गिरणात ४२ टक्के (Girna Dam) पाणीसाठा झाला आहे. असाच पाऊस सुरु राहिला तर गिरणा, मन्याडसह तालुक्यातील लहान मोठे मध्यम प्रकल्पही क्षमतेने भरून वाहतील, असे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा: वादग्रस्त शायर मुनव्वर राणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल


पावसाळा सुरु झाल्यानंतर सुरवातीला पाऊस झाला. त्या पावसावर पेरण्या झाल्या. मात्र, त्यानंतर पावसाने तब्बल महिनाभर उघडीप घेतल्याने शेतकरी चिंतातूर झाले होते. शेतांमध्ये पिकांना पाण्याची अत्यंत आवश्‍यकता असताना हा पाऊस झाल्याने मोठे संकट टळले आहे. तीन दिवसांपासून अधूनमधून सतत पाऊस होत असल्याने तालुक्यातील ज्या १४ लघु प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा होता, त्यांच्यातही काही अंशी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. मंगळवारपासून (१७ ऑगस्ट) सुरु झालेला पाऊस आजही होता. सततच्या रिपरिप पावसामुळे जनजीवन मात्र काहीसे विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्याचा त्रास वाहनधारकांना होत आहे.

हेही वाचा: हतनूर धरणाचे १४ दरवाजे उघडले,नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशाराधरणांच्या साठ्यात वाढ
तब्बल महिनाभर रूसलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले होते. तालुक्यावर दुष्काळाचे सावट निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, सोमवारच्या मध्यरात्रीपासून पावसाचे आगमन झाल्याने संकट टळले. सततच्या संततधारेमुळे तालुक्यातील लहान मोठ्या धरणांमधील पाण्याच्या पातळीतही वाढ होत आहे. गिरणा धरणाच्या लाभक्षेत्रात सुरु असलेल्या पावसामुळे सुमारे १ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग गिरणा नदीपात्रात येत आहे. ज्यामुळे गिरणा धरणाची पाणी पातळी दोन ते तीन टक्क्यांनी वाढली आहे. सद्यःस्थितीत गिरणा धरणात १० हजार ६४७ दशलक्षघनफूट इतका म्हणजेच ४२ टक्के जलसाठा झाला आहे. त्यातील ३ हजार दशलक्षघनफूट मृतसाठा वगळता धरणात ७ हजार ६४७ दशलक्षघनफूट जलसाठा झाला आहे. चणकापूर धरणातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग पाहता, गिरणेच्या पाणीसाठ्यात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. मन्याड धरणाच्या साठ्यात मात्र चांगलीच वाढ झाली आहे. चार दिवसांपूर्वी मन्याडचा जलसाठा २७ टक्क्यांवर होता, जो आज ४५ टक्क्यांवर गेला आहे. तीन दिवसातच धरणाच्या जलसाठ्यात २८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तालुक्यातील खडकीसीम, वाघले-१, कुंझर, वाघले-२, कृष्णापुरी या लघुप्रकल्पांच्या साठ्यातही चांगली वाढ झाली आहे. मात्र, उर्वरित ९ प्रकल्पांमध्ये अद्यापही शून्य टक्के जलसाठा आहे.

दोन मंडळात अतिवृष्टी
तहसील प्रशासनाकडून उपलब्ध आकडेवारीनुसार, तालुक्यातील सात मंडळांपैकी हातले व तळेगाव मंडळात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी घेतलेल्या नोंदीनुसार हातले मंडळात ७० मिलीमीटवर व तळेगाव मंडळात ६५ मिलीमीटर अशी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. उर्वरित पाच मंडळातही तीन दिवसात दमदार पाऊस झालेला आहे.

Web Title: Marathi News Chalisgaon Three Days Good Rain Girna Dam Water Level Increase

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :rainjalgaon news