esakal | खडसेंशिवाय भाजपच्या ताकदीची कसोटी; अमरिशभाईच्या राजकीय अस्तित्वाचा शोध 
sakal

बोलून बातमी शोधा

eknath khadse amrish patel

राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्टवादी कॉंग्रेस ‘महाविकास आघाडी’स्थापन करण्यात आली.त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केली आज त्याला एक वर्षे पूर्ण होत आहे. ही आघाडी सत्तेवर आल्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणूकीच्या माध्यमातून प्रथमच जनतेच्या दरबारात कौल आजमावित आहेत.

खडसेंशिवाय भाजपच्या ताकदीची कसोटी; अमरिशभाईच्या राजकीय अस्तित्वाचा शोध 

sakal_logo
By
कैलास शिंदे

जळगाव : एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्याने भाजपच्या खानदेशातील ताकदीवर परिणाम होईल असे राजकीय जाणकारांचे मत आहे, मात्र भाजप नेत्यांनी हा दावा खोडून काढीत ते पक्ष सोडून गेले तरी कोणताही फरक पडणार नाही असा विश्‍वास व्यक्त केला आहे. याचीच पहिली परिक्षा आता खानदेशातील धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत दिसून येणार आहे. या निवडणूकांच्या निकालानंतर खानदेशात राजकीय वातावरणाचा कल दिसून येइल.मात्र यात पक्षांतरानंतर भाजपच्या ताकदीची कसोटी आणि अमरिशभाई पटेल याच्या राजकीय अस्तित्वाचा शोधही असेल. 
 
राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्टवादी कॉंग्रेस ‘महाविकास आघाडी’स्थापन करण्यात आली.त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केली आज त्याला एक वर्षे पूर्ण होत आहे. ही आघाडी सत्तेवर आल्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणूकीच्या माध्यमातून प्रथमच जनतेच्या दरबारात कौल आजमावित आहेत. त्यामुळे राज्यातील शिक्षक, पदवीधर तसेच स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणूकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. मात्र त्यात खानदेशातील धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणूकीकडे विशेष लक्ष असणार आहे. कारण भाजपचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर प्रथमच हि निवडणूक होत आहे. त्यामुळे खडसेंच्या पक्षांतरांचा किती परिणाम होईल हेही या निवडणूकीत दिसून येणार आहे. 

उमेदवारांचीही कसोटी 
धुळे नंदुरबार विधानपरिषद मतदार संघातील उमेदवारांची खऱ्या अर्थाने कसोटी ठरणार आहे. या उमेदवारांचे पक्षीय राजकारणही एक वेगळच आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमरिशभाई पटेल एकेकाळी कॉंग्रेसचे आमदार होते. कॉंग्रेसचे कट्टर कार्यकर्तेम्हणून त्यांची ओळख होती. मात्र गेल्या विधानसभा निवडणूकअगोदर त्यानी कॉंग्रेसला रामराम करीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षाकडून ते प्रथमच निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे पक्ष बदलून त्यांना यश मिळणार काय?हीच त्यांची कसोटी ठरणार आहे. शिवाय ही निवडणूक त्यांच्या राजकीय अस्तीत्वही ठरविणार आहे. तर कॉंग्रेसचे उमेदवार अभिजीत पाटील हे नंदुरबारचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. मात्र त्यांच वडिल मोतीलाल पाटील हे भारतीय जनता पक्षात आहेत. ते शहाद्याचे नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे अभिजीत पाटील यांच्या दृष्टीनेही ही निवडणूक महत्वाची आहे. त्यांचीही कसोटीच आहे. 

चंद्रकांत रंघुवंशीही परिक्षाच 
कॉंग्रेसचे माजी आमदार व सद्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशीही यांचीही खऱ्या अर्थाने परिक्षा आहे. रघुवंशी हे कॉंग्रेसमध्ये होते, पक्षाने त्यांना आमदारकिही दिली,नंदुरबार शहरात कॉंग्रेसची ताकद म्हणून रघुवंशी यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, शिवसेनेनेही त्यांचे नाव राज्यपाल नियुक्त आमदारकिसाठी दिलेले असून त्यांचा उचित सन्मान केला आहे. आजच्या स्थितीत महाविकास आघाडीत कॉंग्रेस व शिवसेना सोबत आहे. अशा स्थितीत विधानपरिषदेत कॉंग्रेसच्या उमेदवाराला रघुवशी यांचा कितपत फायदा होतो याकडेच लक्ष असणार आहे. 
 
खडसेशिवाय भाजपची ताकद 
भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली, खडसे यांच्या भाजप सोडण्यामुळे उत्तर महाराष्ट्रात विशेत: खानदेशात भारतीय जनता पक्षाची राजकीय ताकद कमी होईल, निवडणूकीत त्याचा पक्षाला मोठा फटका बसेल असे म्हटले जात आहे. मात्र भाजपच्या नेत्यांनी हा दावा खोडून काढत त्यांच्या पक्ष सोडण्यामुळे कुठेही आमची ताकद कमी होणार नाही असे त्यानी म्हटले आहे.त्यामुळे आता खडसे यांच्या शिवाय भाजप आपली ताकद दाखवून देणार आहे. त्यामुळे या जागेवर विजय मिळवून खडसे यांच्या जाण्यामुळे खानदेशात पक्षावर कोणताही परिणाम झालेला नाही, पक्षाची ताकद वाढली आहे हे पक्षाला दाखवून द्यावे लागणार आहे. 
 
खडसेंच्या ताकदीचे यश 
भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश एकनाथराव खडसे यांचा खानदेशात असलेल्या प्रभावाची ताकदही या निवडणूकीत दिसणार आहे. धुळे-नंदुरबार मतदार संघात खडसे यांचे मोठ्या प्रमाणात समर्थक नगरसेवक आहेत. शहादा तालुक्यात त्यांचे नातेसंबधही आहेत. त्यामुळे खडसे यांच्या ताकदीवर महाविकास आघाडीचे उमेदवा अभिजीत पाटील यांना यश मिळते कि नाही याचीही कसोटी आहे. खडसे यांच्या पक्षांतरानंतर ही खानदेशात ही पहिलीच निवडणूक होत असल्यामुळे या निवडणूकीच्या निकलानंतर खानदेशात खऱ्या अर्थाने राजकीय ध्रृवीकरण होईल,भारतीय जनता पक्षाचे अमरिश पटेल निवडून आले तर भाजपला ती खऱ्या अर्थाने मोठी ताकद ठरणार आहे. तसेच खडसेच्या पक्षांतरामुळे पक्षावर कोणताही परिणाम झालेला नाही हे सुध्द भाजपला छातीठोकपणे महाराष्ट्रात जाहिरपणे सांगता येणार आहे. कॉंग्रेसेचा उमेदवार विजयी झाला तर खडसे पक्षांतराचे हे यश असणार आहे. यामुळे महाविकास आघाडीलाच बळ मिळणार आहे. तर भाजपला पुन्हा एकदा आपली राजकीय व्युव्हरचनाही बदलावी लागणार आहे. मात्र या निकलाचे परिणाम राज्यातील राजकारणावर होईलच परंतु खानदेशात अधिक प्रमाणात होईल एवढे मात्र निश्‍चित.