बेरोजगारांना गंडा घालून गुजरातमध्ये मांडले बस्तान; शेवटी तो अडकलाच 

रईस शेख
Monday, 30 November 2020

गुन्ह्याचे तपासाधिकारी उपनिरीक्षक किशोर पवार, अजित पाटील, फिरोज तडवी यांना संशयिताच्या गुजरात वास्तव्याची गुप्त माहिती मिळाली होती. संशयिताचा शेाध घेण्यासाठी पथकाने गुजरात गाठून शोध सुरू केला.

जळगाव : जिल्‍हा सामान्य रुग्णालयात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत शहरासह जिल्ह्यातील तरुणांची लाखो रुपयांत फसवणूक झाली होती. गेल्या वर्षी १२ ऑक्टोबर २०१९ ला दाखल गुन्ह्यातील प्रमुख संशयित गुन्हा घडल्यापासून फरारी होता. जिल्‍हापेठ पोलिस पथकाने त्यास भरुच (गुजरात) येथून सापळा रचत अटक केली. 
शहरातील दीक्षितवाडी येथील रहिवासी विनायक जाधव (वय ३३) याने १२ ऑक्टोबर २०१९ ला जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यात नमूद केल्याप्रमाणे, योगेश पाटील (२९), दीपक सोनवणे (२९), मंगेश बोरसे (४५) अशा तिघांनी संगनमत करून जिल्‍हा रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आश्वासित केले हेाते. नोकरी लावून देण्यासाठी विनायक जाधव याची दीड लाखात, धीरज सरपटे (८० हजार), दिनेश पाटील (एक लाख १५ हजार), गौतम चव्हाण (८० हजार), अजय खेडकर (८० हजार), रूपेश पाटील (एक लाख ३० हजार), राकेश कोळी (एक लाख ३० हजार) यांच्यासह इतर बेरोजगार तरुणांची फसवणूक झाल्याप्रकरणी जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. गुन्ह्यातील दीपक सोनवणे याला १७ सप्टेंबरला, तर मंगेश बोरसे याला २१ सप्टेंबरला अटक करण्यात आली असून, दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. गुन्ह्याचा मास्टर माइंड संशयित योगेश पाटील गुन्हा घडल्यापासून फरारी हेाता. 

अशी झाली अटक 
गुन्ह्याचे तपासाधिकारी उपनिरीक्षक किशोर पवार, अजित पाटील, फिरोज तडवी यांना संशयिताच्या गुजरात वास्तव्याची गुप्त माहिती मिळाली होती. संशयिताचा शेाध घेण्यासाठी पथकाने गुजरात गाठून शोध सुरू केला. योगेश सतत ठिकाणे बदलवत असल्याने तो मिळून येण्यास अडचणी येत होत्या. गुजरात पोलिसांच्या सहकार्याने संशयिताला अंकलेश्वर (ता. भरुच) येथून अटक करून रविवारी जिल्‍हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयिताला २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon civil hospital job parson arrested police