जळगाव शहरातील खड्डे भरण्यास प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 November 2020

जळगाव शहरातील सर्वच भागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिक अत्यंत त्रस्त झाले आहेत. रस्तेदुरुस्ती करावी यासाठी शहरात विविध संघटनांतर्फे आंदोलनेही करण्यात आली.

जळगाव : शहरातील सर्व भागातील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती करण्यास सुरवात करण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे स्वतंत्र फंडही मंजूर करण्यात आला आहे. शहरातील रस्ते आता खड्डेमुक्त होतील, अशी माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली. 
जळगाव शहरातील सर्वच भागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिक अत्यंत त्रस्त झाले आहेत. रस्तेदुरुस्ती करावी यासाठी शहरात विविध संघटनांतर्फे आंदोलनेही करण्यात आली. मात्र शहरात अमृत, तसेच भुयारी गटारीची योजना याची कामे काही भागात सुरू असल्यामुळे रस्ते दुरुस्तीची कामे करता येवू शकत नव्हती. पावसाळ्यात तर नागरिकांना खड्ड्यांतील पाण्यातून वाट काढावी लागत होती. शहरातील या खड्ड्यांबाबत विरोधकांनी सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या नेत्यावरही जोरदार टीका केली होती. शुक्रवारीच जळगाव दौऱ्यावर आलेल्या राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी पक्षाचे नेते गिरीश महाजन, तसेच महापौर भारती सोनवणे यांच्यावर टीका केली होती. त्यांनी अगोदर शहरातील खड्डे बुजवावे त्यानंतर आंदोलन करावे, असे मतही व्यक्त केले होते. 

दहा कोटींचा निधी 
शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने नियोजन केले आहे. अशी माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली. याबाबत त्या म्हणाल्या, की शहरातील सर्व भागातील खड्डे बुजविण्यसााठी दहा कोटी रुपयांची तरतूद महापालिका फंडातून करण्यात आली आहे. सर्व मक्तेदारांनाही आदेश देण्यात आले असून, त्यांनी काम सुरू केले आहे. 
 
अमृत, भुयारी कामांचा अडसर नाही 
खड्डे बुजवितांना काही भागात अद्यापही भुयारी गटारी व अमृत योजनेच्या कामाचा अडसर निर्माण होईल काय? असे विचारले असताना महापौर सोनवणे म्हणाल्या, की ज्या ठिकाणी योजनेचे काम झालेले नाही, परंतु त्या भागात मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत, अशा भागात खड्डे बुजविण्याचे काम करण्याचे आदेश देण्यात आले आहे. काम झाल्यावर त्या ठिकाणी पुन्हा रस्त्याचे काम करण्यात येईल. 

कामाची स्वतः पाहणी करणार 
शहरातील रस्ते दुरुस्तीची कामे अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे सांगून महापौर म्हणाल्या, की ज्या भागात रस्ता दुरुस्तीचे काम मक्तेदाराने केले आहे तेथील कामाची आपण अचानक पाहणी करणार आहोत. जर काम व्यवस्थित झाले नसेल तर संबंधित मक्तेदारावर कारवाई करण्यात येईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corporation damage road repair start