esakal | आईच्या चारित्र्यावर बापाचा संशय..पित्याचा दोघा मुलांकडून खून
sakal

बोलून बातमी शोधा

crime

आईच्या चारित्र्यावर बापाचा संशय..पित्याचा दोघा मुलांकडून खून

sakal_logo
By
रईस शेख


जळगाव : निमखेडी रोडवर जुनी जैन फॅक्टरीशेजारीच खासगी गोशाळा आहे. तेथील वॉचमन प्रेमसिंग अभिसिंग राठोड (वय ५०) यांच्यावर त्यांच्याच दोन मुलांनी चाकूने सपासप वार करून खून केल्याचा प्रकार रविवारी (ता. १२) सकाळी साडेदहाला घडला. गोपाल (वय १८) व दीपक (वय २१) अशी या दोन्ही मुलांची नावे असून, तालुका पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा: अर्ध्यातून मोडला वीज खांब अन् मृत्यू राहिला दोन हात लांब


निमखेडी रोडवर जैन पाइप फॅक्टरीच्या ठिकाणी असलेल्या कांताई नेत्रालयाशेजारीच लता राजेंद्र लुंकड यांची जागा आहे. तेथे विशाल राजेंद्र चोपडा (रा. गणेश कॉलनी) यांनी खासगी गोशाळा उभारली आहे. गुरांच्या राखणदारीसाठी प्रेमसिंग अभिसिंग राठोड, त्यांची पत्नी बसंती, मुले दीपक, गोपाल आणि सून हे एकत्र राहतात. काही दिवसांपासून प्रेमसिंग यांना कानाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर उपचारही करण्यात आले. दोन्ही मुले त्यांना जिल्हा रुग्णालयात नेत होते. आज नेहमीप्रमाणे प्रेमसिंग यांनी कामे उरकली. इतक्यात घरात वाद झाल्याने प्रेमसिंगने गुरे हाकण्याच्या काठीने दोन्ही मुलांना मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी मुलांनी काठी हिसकावून घेतल्यावर प्रेमसिंगने घरातून सुरा आणला. दोन्ही मुलांपैकी एखाद्याला मारणार, इतक्यात एकाने त्याला धरून सुरा हिसकावला. दोघा तरुण मुलांसमोर प्रेमसिंगची ताकद तोकडी पडली. एकाने गचांडी धरून ठेवली, तर दुसऱ्याने धारदार सुऱ्याने सपासप वार केले.


भररस्त्यावर थरार
सकाळी दहाला निमखेडी रोडवर वॉक वरून परतणारे, तसेच येणारे-जाणारे दोन तरुणांसह त्याच्या पित्यामधला हा थरार बघत होते. मांडीवर, पाठीवर एका मागून एक वार झेलूनही प्रेमसिंग ताब्यात येत नसल्याने एका मुलाने थेट छातीत डाव्या बाजूला सुरी खुपसली. काही सेकंदातच प्रेमसिंग रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. प्रत्यक्षदर्शींनी मात्र घटना बघून धूम ठोकली.


दोघांना घरातूनच अटक
घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर तालुका पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. बापाचा खून करून घरातच असलेल्या दोन्ही मुलांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेण्यात येऊन अपर अधीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आला. मृत प्रेमसिंगचा भाऊ रोहिदास यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

हेही वाचा: बापरे! चार किलोमीटरचा रस्ता अन्‌ ३०० खड्डे

आईवर शिंतोडे अन् पित्त खवळले
बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील मूळ रहिवासी असलेले प्रेमसिंग राठोड व त्यांची पत्नी बसंतीबाई यांना गुरे सांभाळण्यासाठी मित्राने कळविल्याने विशाल चोपडा यांनी सालदार म्हणून कामावर ठेवले. काही दिवसांनी त्यांची मुले दीपक, गोपाळ, मुली शिवानी, कविता असे सगळेच तेथे राहायला आले. पिता प्रेमसिंग आणि आई बसंतीबाई यांच्यातील कुरबूर नेहमीचीच होती. मात्र, प्रेमसिंग पत्नी बसंतीच्या चारित्र्यावरच संशय घेऊ लागल्याने मुलांचे पित्याशी खटके उडू लागले. रविवारी सकाळीही त्याच कारणावरून वाद होऊन दोघा मुलांनी धारदार शस्त्राने वार करून पित्याला कायमचे संपविल्याचे कुटुंबीयांकडून पोलिसांना सांगण्यात आले.

loading image
go to top