esakal | जळगाव जिल्ह्यातील धरणांत ५२ टक्के साठा; नद्या, नाले खळाळले
sakal

बोलून बातमी शोधा

Dam

जळगाव जिल्ह्यातील धरणांत ५२ टक्के साठा; नद्या, नाले खळाळले

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः जिल्ह्यात दोन दिवसांपासून दमदार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. शनिवारी मध्यरात्री सर्वत्र झालेल्या पावसामुळे बहुतांश ठिकाणी नदी, नाले व तलाव ओसांडून वाहत आहेत. अनेक शेतांमध्ये, खुल्या पटांगणाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. गेल्या २४ तासांत ६.७ मिलिमीटर पाऊस झाला असून, आतापर्यंत ८९.१ मिलिमीटर (५६.६ टक्के) पावसाची नोंद झाली. अभोरा, मंगरूळ, सुकी, अग्नावती, हिवरा, बोरी, मन्याड प्रकल्प (Dam) शंभर टक्के भरले आहेत.

हेही वाचा: कोरोनामुळे २२ लाख मुले शाळाबाह्य-आमदार डॉ. सुधीर तांबे


हतनूर, गिरणा, वाघूर प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात २४ तासांत ११२ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील ९६ मध्यम लघु व तीन मोठ्या प्रकल्पांत सरासरी ५१.९० टक्के उपयुक्त साठा आहे. बहुळा प्रकल्पात तब्बल ५० टक्क्यांहून अधिक पाण्याची आवक झाल्याने ८५.३ टक्के साठा आहे.

पावसामुळे काही ठिकाणी पिकांचे नुकसान

जून ते ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली, तर काही ठिकाणी ओढ दिल्याने दुबार, तिबार पेरणी झाली आहे. ऑगस्टच्या शेवटच्या सप्ताहात आलेल्या पावसाने उडीद, मुगाचे हाती आलेले उत्पन्न बऱ्याच ठिकाणी मोड आल्याने शेतातच वाया गेले. केवळ २५ ते ३५ टक्के उत्पन्न हाती आले. मात्र, सप्टेंबरच्या सुरवातीपासून जळगाव, चोपडा, यावल, रावेर तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावल्याने बहुतांश ठिकाणी शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे ममुराबादपासून विदगाव ते यावल तालुक्यात आडगाव, अडावद, धानोरा, चोपडा आदी परिसरातील शेतातील पाणी रस्त्याच्या कडेला साचले आहे. अनेक ठिकाणी तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे, तर या पावसामुळे काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: चोपड्याच्या डॉ. देविका पाटीलचा जर्मनीत विक्रम; आयर्न मॅन स्पर्धा जिंकली

चाळीसगाव तालुक्यात सर्वाधीक पाऊस
गेल्या २४ तासांत सर्वांत जास्त पाऊस चाळीसगाव तालुक्यात ३१.९ टक्के झाला. जळगाव ०.१, भुसावळ ०.८, यावल १७.२, रावेर ३.६, मुक्ताईनगर ५.०, अमळनेर ६.४, चोपडा ०.४, एरंडोल ०.७, पारोळा ३.३, जामनेर ३.३, पाचोरा ५.०, भडगाव १७.५, धरणगाव आणि बोदवड तालुक्यात शून्य टक्क्यांसह ६.७ मिलिमीटर पाऊस झाला.


हतनूरचे सहा दरवाजे उघडले

जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे हतनूर प्रकल्पाचे सहा गेट पूर्ण उघडून ३१ हजार ६३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे. मोठ्या प्रकल्पात ५८ टक्के साठा आहे. मध्यम प्रकल्पापैकी मोर ६१.९१, बहुळा ८५.०३, तोंडापूर ९३.४१, अंजनी ४७.४८, गूळ ३२.३७, भोकरबारी १६.८४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे, तर अभोरा, मंगरूळ, सुकी, अग्नावती, हिवरा, बोरी, मन्याड प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. बोरी प्रकल्पाचे ५ गेट .३० मीटर व ६ गेट .१५ मीटरने उघडून ७२६१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग बोरीपात्रात, तर मन्याड प्रकल्पातून १८१८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

हेही वाचा: रेल्वे किमेनची सतर्कता आणि धाडसामूळे मोठी दुर्घटना टळली..!

तापी, गिरणाकाठाला दक्षतेचा इशरा
बोरी, तापीसह गिरणा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सावधतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात दोन- तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे बहुतांश मध्यम लघुप्रकल्पांत पाण्याची आवक होत असून, प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत. तापी, बोरी, हिवरा, मन्याड आदी प्रकल्प पूर्ण भरले आहेत.

loading image
go to top