
‘त्या’ महसूल मंडळांना आगाऊ २५ टक्के रक्कम
अमळनेर : पावसाने (Rain)सुरवातीचे दोन महिने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे कापसाचे उत्पन्न (Cotton Crop ) हातचे गेल्याने नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादन क्षमता ५० टक्क्यांपेक्षा खूपच कमी दिसून आल्याने तालुक्यातील आठही मंडळांतील शेतकऱ्यांना पीकविमा (Crop insurance) संरक्षित रकमेच्या २५ टक्के रक्कम आगाऊ म्हणून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी भारतीय एक्सा विमा कंपनीला दिले आहेत.
संपूर्ण अमळनेर तालुक्यात सुरवातीचे दोन महिने पाऊस न पडल्याने पिकांची वाढ झाली नाही. कालमर्यादा संपली होती, उत्पन्न हातचे गेले होते, त्यामुळे पीकविमा मिळावा म्हणून तालुक्यातील विविध शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळा स्वतंत्र पथके पाठवून पीक पाहणी केली होती. त्यात गेल्या सात वर्षांतील कापसाची सरासरी कापूस उत्पादकता किलोमध्ये हेक्टरी ग्राह्य धरून नजर अंदाजानुसार या वर्षी पावसाअभावी अथवा खंड पडल्याने किती येऊ शकतो, याची पाहणी करण्यात आली.
आठ मंडळात कमी उत्पन्न
त्यात आठही मंडळांत अपेक्षित उत्पन्न ५० टक्क्यांपेक्षा खूप कमी येत असल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकारी राऊत यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत शासन नियमानुसार तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जोखीम ही बाधित अधिसूचित क्षेत्रातील कापूस पीकविमाधारक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई अदा केल्यानंतर पीक हंगामाच्या अखेरीस उत्पन्नाच्या आधारे निश्चित करण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईसाठी पात्र राहील व आगाऊ रक्कम नुकसानभरपाईत समायोजित करण्यात येईल.