खडसेंपुढे पक्षाची मोट, जिल्ह्याच्या पालकत्त्वाचे दुहेरी आव्हान !

खडसेंपुढे पक्षाची मोट, जिल्ह्याच्या पालकत्त्वाचे दुहेरी आव्हान !

जळगाव ः राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या निमित्ताने खडसेंना पुनर्वसनाची, तर खानदेशात पक्षाचे संघटन मजबूत करण्याची राष्ट्रवादीला अपेक्षा असेल, आणि ती असलीच पाहिजे. या दोन्ही बाबींच्या पूर्ततेसाठी दोन्ही बाजूंकडील परस्पर सहकार्य गरजेचे ठरेल. पक्षातील जुन्याजाणत्यांना पक्षासाठी एकत्रित येताना खडसेंचे नेतृत्व मान्य करावे लागेल.. ही मंडळी ते नेतृत्व मान्य करेल का? हा प्रश्‍न आहे. दुसरीकडे, नाही म्हटलं तरी गटा-तटात विभागलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची मोट बांधण्यासह पक्ष कुठलाही असला तरी जिल्ह्याचे नेतृत्व, पालकत्व आपल्याकडेच असते, हे खडसेंनाही सिद्ध करावे लागणार आहे. 

आवश्य वाचा- महाजनांचे खडसेंवर पून्हा टिकास्त्र; मी मी पणा करणारे गेल्याने पक्षाला काही फरक पडणार नाही ! 

कोणत्याही क्षेत्रात, प्रक्रियेत बदल होताना काहीतरी आवाज, गोंधळ अपेक्षितच असतो. अगदी रेल्वेगाडीही रुळ बदलत असताना खडखडाट होतोच. राजकीय क्षेत्रही त्याला अपवाद नाही. त्यामुळे ४० वर्षे एका पक्षात निष्ठेने सेवा करणारा खडसेंसारखा दिग्गज नेता भाजपचा त्याग करत राष्ट्रवादीत प्रवेश करता झाला, तर खडखडाट होणारच.. आणि तसा तो झालाही. 


एखादा बडा नेता एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातो तेव्हा ज्या पक्षात तो प्रवेश करतो, तेथील प्रस्थापितांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होणे स्वाभाविक ठरते. खडसेंच्या प्रवेशाची चाचपणी सुरु असताना स्थानिक नेत्यांच्या ज्या भावना होत्या त्या याच असुरक्षितेतून होत्या. मात्र, वेगवेगळ्या अंगाने अभ्यास केल्यानंतर मोठ्या साहेबांनी पक्कं ठरवलं.. त्याला विरोध कोण करणार? मुळात, राष्ट्रवादीत जळगाव जिल्हा व खानदेश, उत्तर महाराष्ट्रातही स्थानिक नेत्यांचे गटतट आहेत. जळगाव जिल्ह्यात तर पदाधिकाऱ्यांमधील वादाने एकाला निलंबित व्हावे लागले तर दुसऱ्यावर ‘हनी ट्रॅप’ झाल्याचा आरोप करण्याची वेळ आली. एरवीही जिल्ह्यातील ही नेतेमंडळी साहेब अथवा दादांच्या दौऱ्याशिवाय तन-मन-धनाने कधीही एकत्रित येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याचाच परिणाम म्हणून की काय, २०१४ आणि आता २०१९लाही राष्ट्रवादीचा एकमेव आमदार निवडून येऊ शकला. हाच मुद्दा अधोरेखित करुन साहेबांनी स्थानिकांची कानउघडणी केली व खडसेंच्या प्रवेशाला हिरवा कंदीलही दर्शविला. 

आवर्जून वाचा- घरात सुरू होता बनावट नोटांचा छापखाना; पोलिसांची अचानक धाड आणि घरातून निघाला धुर ! 

पक्षाची धुरा वाहायला कार्यकर्त्यांचे केडर लागते, तसे या केडरला दिशा दर्शविणारे नेतृत्वही लागते. हे नेतृत्व खडसेंच्या रुपाने राष्ट्रवादीच्या तंबूत दाखल झालेय, असे म्हणता येईल. पण, त्यासाठी खडसेंना स्थानिक नेत्यांची मोट बांधावी लागेल. ४० वर्षे सेवा करुन भाजपला गावागावात पोचविल्याचा दावा खडसे करतात, तो योग्यही आहे. भाजपतील केडरला खडसेंसारखे दमदार व दिशादर्शक नेतृत्व लाभले म्हणून हा पक्ष तळागाळात पोचला. पण, तेव्हाचे चाळीशीतील खडसे आता सत्तरीच्या उंबरठ्यावर आहेत. वय व प्रकृतीच्या मर्यादांवर त्यांच्यातील लढवय्या बाणा कदाचित मात करेलही. पण, सोबत त्यांना नव्या टीममधील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची फळी लागणारच आहे. एकीकडे पक्षसंघटनाची मोट बांधणे व दुसरीकडे स्वत:ला जिल्ह्याचे पालक, नेतृत्व म्हणून सिद्ध करणे.. असे दुहेरी आव्हान खडसे व आता पर्यायाने राष्ट्रवादीसमोर आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com