खडसेंनी ‘नो कमेंट्स’ म्हणत सस्पेन्स कायम ठेवला !

देविदास वाणी
Monday, 12 October 2020

मुंबईत नियमित वैद्यकीय तपासणी व पक्षाच्या बैठकीसाठी गेल्याचा दावा त्यांनी केला असला तरी त्यांच्या पक्षांतराची चर्चा ते परतल्यानंतरही सुरू आहे.

जळगाव : मुंबई वारी करून आलेले भाजपतील नाराज नेते एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांना अद्यापही पूर्णविराम मिळालेला नाही. मुंबईहून परतल्यानंतर रविवारी माध्यम प्रतिनिधींनी खडसेंशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी ‘ब्र’ शब्दही न उच्चारता मुक्ताईनगरकडे प्रयाण केले. तेथेही पत्रकारांना ‘नो कमेंट्स’ म्हणत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. 

आवश्य वाचा- युरोप, पाक, बलुचिस्तानातून आले विदेशी ‘पाहुणे’;पक्षीमित्रांनी घेतल्या महत्त्वपूर्ण नोंदी
 

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यापासून भाजपत अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत खडसेंनी वेळोवेळी राज्य नेतृत्वावर तोफ डागली. गेल्या महिन्यात त्यांनी थेट फडणवीसांचे नाव घेत टीका केली. तेव्हापासून त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेने जोर धरला. शरद पवारांनी यांच्या प्रवेशाची चाचपणी केल्यानंतर खडसे स्वत: तीन-चार दिवसांपासून मुंबईत होते. त्या ठिकाणी त्यांची पवारांशी भेट होणार, अशीही चर्चा रंगली. मात्र, ती भेट काही झाली नाही. 

जळगावी परतले 
मुंबईत नियमित वैद्यकीय तपासणी व पक्षाच्या बैठकीसाठी गेल्याचा दावा त्यांनी केला असला तरी त्यांच्या पक्षांतराची चर्चा ते परतल्यानंतरही सुरू आहे. येत्या काही दिवसांत ते निर्णय जाहीर करतील, असे सांगितले जात आहे. रविवारी याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता त्यांनी ‘ब्र’ शब्दही न उच्चारता वाहनात बसून मुक्ताईनगरकडे प्रयाण केले. मुक्ताईनगरलाही पत्रकारांशी त्यांनी या विषयावर बोलणे टाळले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडेे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Eknathrao Khadse refuses to speak on the issue of defection