एकनाथ खडसे गेले तरी भाजपला खिंडार पडणार नाही- महाजन 

देविदास वाणी
Tuesday, 27 October 2020

भाजपच्या बैठकीत पक्ष संघटन मजबुतीच्या दृष्टीने वरिष्ठ नेत्यांकडून चाचपणी करण्यात आली. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या स्नुषा भाजपा खासदार रक्षा खडसे या बैठकीला अनुपस्थित होत्या.

जळगाव ः ‘भारतीय जनता पार्टी ’ हा विचारांवर चालणारा पक्ष असून व्यक्ती केंद्रित पक्ष नाही. त्यामुळे पक्षातील कोणी गेले तर त्याचा काही एक परिणाम भाजपावर पडणार नाही. त्यामुळे एकनाथ खडसे गेल्याने भाजपाला खिंडार पडणार नसून भाजपचे कोणीत त्यांच्या सोबत जाणार नाही. याउलट आगामी काळात पक्षसंघटन मजबूत करण्यासंदर्भात चाचपणी सुरू असल्याची माहिती माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

आवश्य वाचा- शरद पवारांमुळे माझे राजकीय पुनर्वसन झाले- खडसे 
 

माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खडसेंच्या राजीनाम्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. हीच शक्यता गृहीत धरून जळगाव जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीच्या वतीने आज दुपारी पक्ष कार्यालयात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.महाजन बोलत होते. 

या बैठकीत पक्ष संघटन मजबुतीच्या दृष्टीने वरिष्ठ नेत्यांकडून चाचपणी करण्यात आली. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या स्नुषा भाजपा खासदार रक्षा खडसे या बैठकीला अनुपस्थित होत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

 

कोअर कमिटीतर्फे झालेल्या बैठकीला प्रांत संघटक विजय पुराणिक, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंदूलाल पटेल, माजी आमदार स्मिता वाघ, विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, महापौर भारती सोनवणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजन पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील आद उपस्थित होते. 

बैठकीनंतर माजीमंत्री महाजन यांनी बैठकीच्या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, आजची कोअर कमिटीची बैठक ही नियमित स्वरूपाची होती. महाराष्ट्रात फक्त जळगाव जिल्ह्यात पक्षाची कार्यकारिणी गठीत करण्याचे काम राहिले आहे. ही कार्यकारिणी गठीत करण्यापूर्वी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या म्हणणे, त्यांचे मत जाणून घेण्यासाठी हो बैठक घेतली. त्यानंतर आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय आढावा घेऊन कार्यकारिणी जाहीर होणार आहे. पक्षसंघटन मजबुतीसाठी चाचपणी सुरू आहे 

आवर्जून वाचा- भाजपचा व्हाट्सअप गृप झाला राष्ट्रवादीचा, मग काय भाजप कार्यकर्त्यांची झाली पंचाईत !
 

खडसे दिल्लीत 
बैठकीला खासदार रक्षा खडसे अनुपस्थित असल्यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता, श्री. महाजन म्हणाले की, रक्षा खडसे काल रात्री पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीला गेल्या आहेत. त्या संदर्भात त्यांनी वरिष्ठ नेत्यांना पूर्व कल्पना देखील दिली होती. पक्षाची परवानगी घेऊनच त्या दिल्लीला गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत संदर्भात तर्कवितर्क लढवणे चुकीचे आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Even if Eknath Khadse leaves the BJP, it will not make any difference to the BJP