जळगावात आले तरी प्रत्‍यक्ष भेट नाही; पण फोनवरून संपर्क...काय केला संवाद

Eknath Khadse Devendra fadnvis
Eknath Khadse Devendra fadnvis

जळगाव : राज्याच्या पक्षनेतृत्वावर नाराज असलेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर असताना त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संवाद साधला. वरणगावचे नगरला हलविलेले पोलिस प्रशिक्षण केंद्र व खतांच्या साठेबाजीबाबत सरकारकडे प्रश्‍न मांडावेत, अशी विनंती खडसेंनी फडणवीसांना केली. 


फडणवीस जळगाव दौऱ्यावर आल्यानंतर खडसेंची भेट घेणार काय याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र, ही भेट नियोजनात नव्हती. खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांनी फडणवीस यांची जैन हिल्स येथे भेट घेतली. त्यानंतर त्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीसही उपस्थित होत्या. एकनाथराव खडसे मात्र उपस्थित राहू शकले नाही. ते शेतात गेलेले असतांना त्यांचा पायाला किरकोळ फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे त्यांना ट्रॅक्शन लावण्यात आल्याने ते भेटू शकले नाहीत. मात्र खडसे यांनी फडणवीस यांची भ्रमणध्वनीवर चर्चा केली. 
याबाबत खडसे यांच्याशी संपर्क साधला असतांना ते म्हणाले, काल (ता. ८) फडणवीस यांच्या ताफ्यातील वाहनाला नशिराबाद जवळ अपघात झाल्याचे कळताच आपण त्यांना भ्रमणध्वनी करून विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी सर्व जण सुखरूप असल्याचे सांगितले. आज सकाळी आपण त्यांच्याशी चर्चा केली. 

पोलिस प्रशिक्षण केंद्राबाबत.. 
जळगाव जिल्ह्यात वरणगाव येथे मंजूर झालेले पोलिस प्रशिक्षण केंद्र नगर जिल्ह्यात वळविले आहे. त्याबाबत आपण दोघांनी ते जळगावला मंजूर करून आणले आहे, ते हलविणे योग्य नाही. हा जळगाव जिल्हावर अन्याय असून त्यासंबंधी मुद्दा आपण पत्रकार परिषदेत घ्यावा तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सांगून ते जळगाव येथेच ठेवण्यास सांगावे अशी विनंती फडणवीसांना केली. तसेच सद्यस्थितीत खतांची साठेबाजी मोठ्या प्रमाणात होत आहे. आपले सरकार असताना आपण साठेबाजी न होऊ देता शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून देत होतो. या साठेबाजीबाबतही आपण पत्रकार परिषदेत माहिती द्यावी असेही आपण त्यांना सांगितले. त्यावर फडणवीसांनी सांगितले, की आपण सद्य:स्थितीत केवळ ‘कोविड’संदर्भात राज्यात दौऱ्यावर असून त्याचसंदर्भात माहिती देत आहोत. परंतु विधानसभेत आपण हे मुद्दे उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी आपल्या तब्बेतीचीही विचारपूस केली अशी माहिती खडसे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com