esakal | दसऱ्याला जळगाव जिल्ह्याचा बाजार फुलला; तब्बल पन्नास कोटींच्या वर झाली उलाढाल ! 
sakal

बोलून बातमी शोधा

दसऱ्याला जळगाव जिल्ह्याचा बाजार फुलला; तब्बल पन्नास कोटींच्या वर झाली उलाढाल ! 

कोरोनामुळे स्‍वतःचे वाहनच सुरक्षित, या उद्देशाने प्रत्‍येकजण विचार करत आहे. त्यामुळे वाहन खरेदीमध्ये मोठी उलाढाल पाहण्यास मिळाली. मागील चार महिने सोडून नवरात्री आणि दसऱ्याचा विचार केल्‍यास यंदा दहा टक्‍क्‍यांनी अधिक गाड्यांची खरेदी ऑटो सेक्‍टरमध्ये झाल्‍याचा अंदाज आहे. 
-अमित तिवारी, राम होंडा 

दसऱ्याला जळगाव जिल्ह्याचा बाजार फुलला; तब्बल पन्नास कोटींच्या वर झाली उलाढाल ! 

sakal_logo
By
राजेश सोनवणे

जळगाव ः दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील बाजारपेठेतील उलाढाल पन्नास कोटींच्या वर झाली आहे. सोने, वाहने, चैनीच्या वस्तू, गृहोपयोगी वस्तू खरेदीसह नवीन घरांचे व्यवहार करण्यात आले. या सर्व क्षेत्रातील उलाढाल पन्नास ते साठ कोटींपर्यंत गेल्‍याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत जाणवत असलेली मंदी दसऱ्याच्या निमित्ताने कमी झालेली पाहण्यास मिळाली.

आवश्य वाचा- दोन वर्षाची बालीका तिसऱ्या मजल्यावरून पडली, दैव बलवत्तर म्हणून वाचली !

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्‍या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीचा योग साधला जात असतो. याकरिता दूरवरून ग्राहक येत असतात. जळगावच्या सुवर्ण बाजारातील सोने खरेदीची गत वर्षीच्या तुलनेतील तफावत पाहिल्‍यास उलाढाल कमी झाल्‍याचे सांगण्यात येत आहे. सोन्याचे दर यंदा पन्नास हजारांच्या वर गेल्‍याचा परिणाम जाणवला. परंतु, मुहूर्त साधायचा म्‍हणून गुंतवणूक म्‍हणून सोने खरेदीसाठी ग्राहकांचा कल राहिला. यामुळे दिवसभरात सुवर्ण बाजारपेठेत वीस कोटींच्या घरात उलाढाल झाल्‍याचा अंदाज आहे. 

सुवर्ण बाजारात २० कोटींवर उलाढाल 
बाजारात ग्राहकांसाठी निरनिराळ्या सवलतींच्या, बक्षीस योजना जाहीर केल्या होत्या. आपल्या आवडी-निवडी, बजेटचा विचार करून ग्राहकांनी खरेदी करण्याकडेच भर दिला. कपडे खरेदीसाठी नामांकित दुकानांपासून ते गल्लीतील सेलच्या दुकानांमध्ये गर्दी दिसून आली. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात सेलमध्ये कपडे मिळत होते. त्यातही दोन कपड्यांच्या खरेदीवर सूट काही आहे का, अशी विचारणा केली जात होती. कपडे बाजारात पाच कोटींपर्यंत उलाढाल झाल्याची माहिती कापड व्यावसायिकांनी दिली. 

आवर्जून वाचा- भाजपचा व्हाट्सअप गृप झाला राष्ट्रवादीचा, मग काय भाजप कार्यकर्त्यांची झाली पंचाईत !
 

ऑटो सेक्‍टर दहा टक्‍क्‍यांनी उठले 
कोरोनाच्या लॉकडाउननंतर खुले झालेले ऑटोमोबाईल्स क्षेत्रातील उलाढाल वाढली आहे. लॉकडाउननंतर अनेकांनी वाहन खरेदी केली. तर काही जण मुहूर्ताच्या खरेदीसाठी थांबले असल्‍याने दसऱ्याच्या मुहूर्तावर ऑटोमोबाईल क्षेत्र बूम झाल्‍याचे पाहण्यास मिळाले. यात दुचाकींची अधिक विक्री झाली. चारचाकी गाड्यांना मागणी होती. कोरोना असतानादेखील गत वर्षीपेक्षा यंदा दहा टक्‍क्‍यांनी वाढ झाल्‍याचे सांगण्यात येत आहे. जिल्‍हाभरातून साधारण दीड हजार दुचाकी आणि सहाशे चारचाकी विक्री झाल्‍या. 

‘इलेक्‍ट्रॉनिक्‍स’मार्केटमध्येही गर्दी 
इलेक्‍ट्रॉनिक्‍स क्षेत्रात सुमारे दहा ते पंधरा कोटींची उलाढाल झाली आहे. टीव्ही, होम थिएटर, फ्रीज, वॉशिंग मशिन, आरओ सिस्‍टिम यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली. याशिवाय मोबाईल खरेदीवर असलेल्‍या अनेक ऑफर्स कॅश करण्याच्या निमित्ताने मोबाईल खरेदीही अधिक झाली. यामुळे इलेक्‍ट्रॉनिक दुकानांवरदेखील दिवसभर गर्दी पाहण्यास मिळाली. 

गृहप्रवेश अन्‌ बुकिंग 
आपले हक्‍काचे आणि स्‍वप्नातील घर घेण्याचे काम अनेकांनी केले. अगोदरच घेतलेल्‍या घरात दसऱ्याच्या मुहूर्तावर कलशपूजन करत गृहप्रवेश केला. शहरात साधारण साडेतीनशे जणांनी गृहप्रवेश केला. तर नवीन बांधकाम होत असलेल्‍या साईटवर जाऊन मुहूर्तावर बुकिंग करण्याचे काम करण्यात आले.

वाचा- जळगाव- धुळे महामार्गावर होणार ट्रामा सेंटर; जखमींना तात्‍काळ उपचाराची सोय
 

सोने-चांदी उलाढाल - २० ते २५ कोटी 
दुचाकी खरेदी - एक हजार ५०० 
चारचाकी खरेदी - ६०० 
गृहप्रवेश - ३५० 

सुवर्ण बाजारातील दसऱ्याच्या मुहूर्तावर झालेली उलाढाल आकड्यात सांगणे कठीण आहे. परंतु कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्‍या, शिवाय रविवारी दसरा असल्‍याचा परिणामदेखील बाजारपेठेवर पडला. गत वर्षीच्या तुलनेत यंदा सुवर्ण बाजारपेठेत काहीशी शांतता होती. 
-मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, आर. सी. बाफना ज्‍वेलर्स