esakal | शिवसेनेची पुढील वाटचाल भाजपशिवायच राहणार : गुलाबराव पाटील

बोलून बातमी शोधा

gulabrao patil

शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांतील विश्वासाचे नाते कमी झाले. त्याचे कारण भाजपला असलेली सत्तेची हाव, हे आहे. युती करायची आणि शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध सर्व रसद पुरवून बंडखोर उभे करायचे, ही भाजपची नीती महाराष्ट्रात काही अंशी यशस्वी झाली असेल. पण यापुढील लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीत घोडामैदान आमने-सामने राहणार आहे.

शिवसेनेची पुढील वाटचाल भाजपशिवायच राहणार : गुलाबराव पाटील
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : हिंदुत्वाच्या समान विचारधारेवर शिवसेना व भाजप एकत्र होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत जास्त जागा स्वतःकडे घेत शिवसेनेला कमी करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे वेळीच ओळखला. शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांतील विश्वासाचे नाते कमी झाले. त्याचे कारण भाजपला असलेली सत्तेची हाव, हे आहे. युती करायची आणि शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध सर्व रसद पुरवून बंडखोर उभे करायचे, ही भाजपची नीती महाराष्ट्रात काही अंशी यशस्वी झाली असेल. पण यापुढील लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीत घोडामैदान आमने-सामने राहणार आहे. शिवसेनेची पुढील वाटचाल भाजपशिवायच राहील, असे परखड मत शिवसेना उपनेते व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. शिवसेनेचा उद्या (19 जून) वर्धापनदिन आहे, त्यानिमित्ताने ते "सकाळ'शी बोलत होते. 

नक्‍की पहा - मुलगा म्हणतो...वडीलांचा  अंत्यसंस्कार तुम्हीच करा... 


ते म्हणाले, की शिवसेनाप्रमुखांच्या विचारांवर चालणारी, महाराष्ट्रहित व शेतकरी, सामान्यांचा विकास हाच ध्यास घेतलेली शिवसेना यापुढेही तेजाने तळपत राहील. "कोरोना'चे संकट जागतिक असून संपूर्ण महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढा देत आहे. आरोग्य, पोलिस, महसूल, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद या सर्व यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी मुकाबला करत आहेत. नागरिकही शासनाच्या सूचना पाळून मोलाची साथ देत आहेत. 

क्‍लिक करा - Video : पदभारासोबत स्वीकारले कोरोनाचे आव्हान; राऊत यांच्याकड़े जिल्हाधिकारी पदाची सुत्रे


दसरा मेळावा आणि शिवसेनेचा स्थापना दिवस हा प्रत्येक शिवसैनिकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण आहे. आगामी काळात जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांबाबत ते म्हणाले, की आम्ही शिवसैनिक आहोत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश आमच्यासाठी अंतीम आहे. भाजपचे दोन्ही खासदार शिवसेनेमुळेच जळगाव जिल्ह्यात आजवर निवडून आले. पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यास दोन्ही खासदार नाही, तर सर्व अकरा विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेची ताकद दाखवून देऊ. 
आजवर शिवसेना आणि भाजपच्या युतीमुळे काही ठिकाणी क्षमता असूनही शिवसैनिकांवर अन्याय झाला, हे खरे आहे. शिवसेनेची ताकद जिल्ह्यात कुठेच कमी नाही. शिवसैनिक आजही भगव्यावर व शिवसेनाप्रमुखांवर प्रेम करतात. शिवसेनेचा उपनेता व जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून प्रत्येक तालुक्‍यात शिवसैनिकांना हिंमत देण्याचे काम यापुढे केले जाईल. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त तमाम शिवसैनिक, पदाधिकारी व शिवसेनाप्रेमी जनतेला शुभेच्छा.