नाशिक परिक्षेत्रात आता गुन्हेगार दत्तक योजना राबविली जाणार

देविदास वाणी
Thursday, 1 October 2020

जळगावकरांनी कोरोनाच्या काळात सण उत्सव साजरे केले, त्याप्रमाणे आगामी काळात होणारे नवरात्रोत्सव व इतर सण साजरे करावेत. गेल्या सात वर्षांपासून गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारांवर पोलिस विशेष लक्ष देणार आहे.

जळगाव ः दिवसेंदिवस गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. या गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी नाशिक परिक्षेत्रात गुन्हेगार दत्तक योजना राबविणार असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

आर्वजून वाचा- ऑडिओ क्लिप व्हायरलनंतर भाजपात खळबळ, चंद्रकांतदादानी खडसेंशी ऑनलाइन साधला संवाद 

डॉ. दिघावकर हे आज जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी सकाळच्या सुमारास जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर दुपारी पत्रकारांसोबत संवाद साधला. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, चाळीसगाव येथील अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे उपस्थित होते. 

संयम राखून उत्सव 
डॉ. दिघावकर म्हणाले, की जिल्ह्यात गुन्हे नियंत्रणाचे प्रमाण चांगले आहेत. याठिकाणी वैयक्तिक वादातून दरोडा, हाणामारी या सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होत आहेत. ज्या पद्धतीने जळगावकरांनी कोरोनाच्या काळात सण उत्सव साजरे केले, त्याप्रमाणे आगामी काळात होणारे नवरात्रोत्सव व इतर सण साजरे करावेत. गेल्या सात वर्षांपासून गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारांवर पोलिस विशेष लक्ष देणार आहे. अशा गुन्हेगारांना एक पोलिस कर्मचारी दत्तक घेणार आहे. त्या गुन्हेगाराच्या घरी पोलिस कर्मचारी जाऊन त्याची तपासणी करेल. त्यानंतर महिन्यातून एकदा त्या गुन्हेगाराने पोलिस ठाण्यात येऊन हजेरी लावणे आवश्यक असल्याने या योजनेचा नाशिक परिक्षेत्रात अवलंबन करण्याचे आदेश लवकरच देणार आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांचे फसवणूक, बेरोजगारांना अमिष दाखवून त्यांची फसवणुकीचे गुन्हे वाढत असल्याने ही टोळीच जिल्ह्यात सक्रिय आहे. समाजात घातक ठरणाऱ्या गुन्हेगारांवर विशेष लक्ष देणार आहे. 

वाचा- जळगाव जिल्ह्याला देशपातळीवरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार
 

सीमांतर्गत भागांवर नाकाबंदी 
जिल्ह्याला दोन राज्यांच्या सीमा आहेत. याठिकाणाहून मोठ्या प्रमाणात गावठी कट्टे, अवैध दारू, अमली पदार्थांसह गुन्हेगारांसाठी ही सीमा पळून जाण्यास महत्त्वाची भूमिका बजावते. अशा सीमा असणाऱ्या तालुक्यांमध्ये दोन्हीकडील पोलिस अधीक्षकांची बैठक घेऊन याठिकाणी नाकाबंदी करून गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

‘एसपी’ करतील गुटख्यावर इलाज 
जिल्ह्यात गुटखा सर्रासपणे विक्री होत आहे. शाळकरी व महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा व आमली पदार्थ विक्री होत असल्याने विद्यार्थी त्याच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांना गंभीर स्वरूपाच्या आजारांना बळी पडावे लागत आहे. यामुळे जिल्ह्यात गुटखामुक्त करणार असून, आपले नवीन पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे हे डॉक्टर आहेत. तेच गुटख्यावर इलाज करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात काही पोलिसांचे वाळू माफियांसोबत लागेबांधे असल्याचे अनेकवेळा कारवाईमध्ये समोर आले आहे. परंतु त्यांच्यावर ठोस कार्यवाही होत नसल्याने आता वाळूमाफियांसोबत असलेल्यांवर आपण स्वतःच लक्ष घालून कार्यवाही करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. 

दक्षता समितीची पुनर्बांधणी 
सर्वत्र महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. यावर प्रतिबंध घालण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर महिला दक्षता समिती स्थापन करणार आहे. याबाबतचे नाशिक परिक्षेत्रातील प्रत्येक पोलिस अधीक्षकांना पत्र देणार असून, यामध्ये वकील, प्राध्यापक, डॉक्टर, शिक्षक यांचा समावेश करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

पोलिसांसाठी कोविड केअर सेंटर 
राज्यात सध्याच्या स्थितीत ८५९ कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. यात राज्य राखीव पोलिस दलातील २४१ कर्मचारी असून, आतापर्यंत १६ अधिकारी कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरोनाकाळात कर्मचाऱ्यांना तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी पोलिस दलातर्फे ४० बेडचे कोविड केअर सेंटर तयार केले आहे. याठिकाणी २ परिचारिकांसह एक वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यासाठी अधिष्ठांना पत्र दिले असून, ते नियुक्त झाल्यास तत्काळ हे कोविड सेंटर सुरू करणार असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Inspector General of Police said that criminal adoption scheme will be implemented in Nashik area to control crime