
पोलिस असताना म्हसावद औटपोस्टला असणारा सुशील मगरे याने स्वस्त धान्याच्या काळा बाजारात जाणारा ट्रक एकट्याने पकडून तो हिरो ठरला होता. त्यानंतर त्याने खुनाच्या गुन्ह्यातील एका संशयितालाही पकडले होते.
जळगाव : रेशन मालाचा ट्रक पकडून कधीकाळी हिरो ठरलेला बडतर्फ पोलिस सुशील अशोक मगरे दुचाकी चोरी, घरफोडीनंतर थेट लुटारूंची टोळ्या चालवत अट्टल गुन्हेगार बनला. पुण्यातील सराफा दुकान लुटले होते. गुन्हे शाखेने त्याला गुजरात येथून अटक केली होती. तर, पिंपळकोठा यात्रेत गोळीबार प्रकरणात कारागृहात आलेले गौरव पाटील व सागर पाटील या दोघांची भेट होऊन सुशील मगरेने गेल्या सात महिन्यांत त्यांच्याशी मैत्री जोपासत थेट कारागृहाची अभेद्य तटबंदी भेदण्याचा डाव आखला. पोलिस खात्यात असताना घेतलेली ट्रेनिंग याकामी वापरून कारागृहातील प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवून पिस्तूल रोखत काम फत्ते केले.
संबंधीत बातमी - video : बघा कसे पळाले.. जेल रक्षकाला पिस्तुल लावून तिन कैदी फरार
पोलिस असताना म्हसावद औटपोस्टला असणारा सुशील मगरे याने स्वस्त धान्याच्या काळा बाजारात जाणारा ट्रक एकट्याने पकडून तो हिरो ठरला होता. त्यानंतर त्याने खुनाच्या गुन्ह्यातील एका संशयितालाही पकडले होते. नंतर मात्र जिगर बोंडारेच्या टोळीसोबत पिस्तूल लावून ट्रक लुटण्याच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली. दरोड्याच्या गुन्ह्याच्या तपासात त्याचे अनेक गुन्हे उघडकीस आले. पोलिस खात्यातून बडतर्फ केल्यानंतर त्याने गुन्हेगारी टोळीच चालवायला घेतली. पुण्यातील वामनहरी पेठे यांच्या दुकानात २४ नोहेंबर २०१९ ला गोळीबार करून साथीदारांसह दरोडा टाकला होता. मात्र, या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने त्याला २१ डिसेंबर २०१९ ला अटक केली. तेव्हापासून तो कारागृहात होता. बॅरेकमध्ये त्याला सागर संजय पाटील व गौरव विजय पाटील हे दोघे भेटले.
गोळीबारात निष्णात पाटील
पिंपळकोठा (ता. पारेाळा) येथे (२६ नोहेंबर २०१९) यात्रेत गोळीबार केल्याप्रकरणी सागर पाटील, गौरव पाटील यांना नाशिक येथून २९ नोव्हेंबर २०१९ ला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून सागर व गौरव दोघेही कारागृहात सुशील मगरे याच्या बॅरेकमध्ये मुक्कामाला होते. हे दोघे भेटल्यावर सुशील मगरेचे पोलिसी डोके कार्यरत झाले. कारागृहाची सुरक्षा, काम करण्याची पद्धत, बंद असलेले सीसीटीव्ही, शनिवार-रविवार सुरक्षारक्षकांची कमतरता आदी गोष्टींचा सखोल अभ्यास तो करीत होता.
कारागृहातील सीसीटीव्ही बंदच
गेल्या सहा महिन्यांपूर्वी कारागृहाबाहेर एकावर चॉपरने हल्ला झाला होता. तेव्हाही सीसीटीव्ही बंद असल्याचे सांगण्यात आले. कारागृहात बाहेरून जेवणाचा डबा देण्यासाठी शंभर रुपये, भेटण्यासाठी दोनशे, तर वैद्यकीय कारणास्तव जिल्हा रुग्णालयात कैदी वॉर्डात दाखल करवून घेण्यासाठी अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यातून या घटनेला मूर्त रूप मिळाल्याचे आता बोलले जात आहे.
संपादन : राजेश सोनवणे