esakal | उत्सवाच्या उद्देशाला ‘सुलतानी’ हरताळ
sakal

बोलून बातमी शोधा

ganesh utsav

उत्सवाच्या उद्देशाला ‘सुलतानी’ हरताळ

sakal_logo
By
सचिन जोशी


जळगावः तिकडे दक्षिणेत तमिळनाडू, केरळात कोरोना संसर्गाचा (Corona Infection) धोका कायम असताना ‘ओनम’ मोठ्या उत्साहात साजरा झाला. हजारो, लाखोंची गर्दी झाली; पण अपेक्षित होता त्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढला नाही आणि इकडे महाराष्ट्रात (Maharashtra) सलग दुसऱ्या वर्षी शासनाने गणेशोत्सवावर (Ganesh Utsav) निर्बंध घातले. संसर्ग नियंत्रणासाठी उपाय करणे आवश्‍यकच; पण ज्या उत्सवांचा उद्देशच मुळात एकत्रीकरण आहे त्यावर ‘सुलतानी’ बंदी घालून किती दिवस तग धरणार? हा प्रश्‍नच उरतोच.

हेही वाचा: आईच्या चारित्र्यावर बापाचा संशय..पित्याचा दोघा मुलांकडून खून


सेवा, उद्योग, व्यवसाय, पर्यटन, प्रवास, मनोरंजन आदी सर्वच क्षेत्रांची व पर्यायाने अर्थव्यवस्थेची चाके थांबविणाऱ्या कोरोनाचा प्रकोप दीड वर्षानंतरही सुरूच आहे. हे संकट अस्मानी तर मुळीच नाही. कोरोना फैलावणारा कोविड १९ विषाणू निसर्गनिर्मित नाही. आतापर्यंतच्या अभ्यासात तो मानवनिर्मित असल्याचीच माहिती समोर आली आहे. बरं, त्यावर कुठलाही उपचार, औषधीही नाही. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने संसर्ग नियंत्रणासाठी ठरवून दिलेल्या दिशानिर्देशांत सर्वांत प्रमुख निर्देश म्हणजे ‘लॉकडाउन’ आणि अन्य पर्यायी उपाययोजना. ‘डब्ल्यूएचओ’ सांगते ते प्रमाण मानून साऱ्या जगाने ‘लॉकडाउन’चा मार्ग अवलंबूनही व्हायची ती जीवितहानी झालीच. तरीही लॉकडाउनमुळे ती नियंत्रित करू शकलो, असा दावा सुरूच आहे, असो.


साऱ्या जगाचे समजले, पण मुळात भारत हा उत्सवप्रिय देश. कोणताही सण आपण उत्सव म्हणून साजरा करतो. आराध्य दैवत गणेशाचा उत्सव तर महाराष्ट्रातील पर्वणीच. मात्र, कोरोना व त्यासंबंधी निर्बंधांमुळे सलग दुसऱ्या वर्षी हा उत्सव अगदी साधेपणाने साजरा केला जातोय. लोकमान्य टिळकांनी हिंदू समाज एकत्र यावा, संघटित व्हावा, त्याचे प्रबोधन व्हावे या हेतून गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याची प्रथा सुरू केली. मात्र, कोरोनाने गर्दी नको म्हणून या आणि यांसारख्या अनेक उत्सवांच्या उद्देशालाच हरताळ फासलाय.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात पाणीटंचाई मिटण्याची चिन्हे


सध्या भारतात लसीकरणाने वेग घेतलाय. ६० कोटींहून अधिक नागरिकांनी लशीचा किमान पहिला डोस घेतलाय. दुसऱ्या लाटेनंतर संसर्गही बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. तिसऱ्या लाटेचा धोका असला तरी लसीकरणामुळे ती येईलच का? आणि आली तरी इतकी तीव्रता असेल का? याबाबत शंका आहे. तरीही शासन उत्सवावर बंदी घालू लागले आहे, हे न समजण्यासारखे आहे. संसर्ग नियंत्रणासाठी असे उपाय आवश्‍यक आहेतही. मात्र, तिकडे दक्षिणेत ‘ओनम’ साजरा झाला. पश्‍चिम बंगालमध्ये लाखांच्या सभा अनुभवणारी विधानसभा निवडणूकही पार पडली, त्याठिकाणी संसर्गाचा उद्रेक झाला नाही. मग, गणेशोत्सव, दहीहंडी उत्सवातूनच कोरोना संसर्ग होतो का, असा प्रश्‍न उत्सवप्रेमींनी विचारणे स्वाभाविक आहे.

हेही वाचा: जळगावकर सावधान..चार दिवसांत वाढले कोरोनाचे दहा रुग्ण


देशातील अन्य राज्यांमध्ये प्रार्थनास्थळे सर्व नियम पाळून सुरू करण्यात आली आहेत. महाराष्ट्रात मात्र अद्यापही ती बंदच आहेत. राजकीय सभा, मेळावे, नेत्यांचे दौरे सुसाट आहेत. बार, रेस्टॉरंटलही मुभा आहे. दारू दुकानांवर जत्रा भरलेली असते. परंतु, उत्सवांवर बंदी कायम... हा उत्सवप्रिय भक्तांवर अन्याय तर आहेच, शिवाय उत्सवांच्या उद्देशावरच घाला आहे. त्यामुळे थेट उत्सवाच्या उद्देशावर निर्बंध घालण्यापेक्षा कोरोनासंबंधी नियम कडक करत नियमांच्या अंमलबजावणीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

loading image
go to top